‘वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे’ उद्घाटन

रत्नागिरी: अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात २७ सप्टेंबर रोजी ‘वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे’ उद्घाटन करण्यात आले. सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी होते. या कार्यक्रमासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. बाबासाहेब सुतार प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत पृथ्वीगोलाचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. वसुंधरा जिज्ञासा मंडळाचे मुख्य समन्वयक प्रा. दत्तात्रय माळवदे यांनी मंडळाचा उद्देश आणि भविष्यात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी प्रास्ताविकात माहिती दिली. त्यानंतर कु. शाहिस्ता शेख हिने प्रमुख व्याख्याते प्रा. सुतार यांची ओळख करून दिली.

प्रमुख व्याख्याते प्रा. बाबासाहेब सुतार यांनी अंतराळ यान मोहीम, मोहिमेचा उद्देश, तयारी आणि यश याबद्दल स्लाईड आणि माहितीपटाद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी पृथ्वीचे संरक्षण करणे का गरजेचे आहे, यावरही मार्गदर्शन केले.

उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी यांनी मंडळाला शुभेच्छा देत, यापुढेही चांगले उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी प्रा. नितीन पेटावे, प्रा. आदेश मुकणे, प्रा. दत्तात्रय सरगर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य प्रा. निनाद तेंडुलकर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १२ वीतील कु. सरगम कांबळे हिने केले, तर कु. दूर्वा नागवेकर हिने आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.