आपल्या भागाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी जि. प. व पं.स. निवडणुकीमध्ये भाजपाला साथ द्या : नितेश राणे 

आडेली जिल्हा परिषद मतदार संघ कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले l दाजी नाईक :केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाजप पक्षाचे असल्याने त्यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याकडे येत आहे. त्यामुळे आपल्या भागाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया. सिंधुदुर्गात आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून आज मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे या मतदारसंघात जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या भाजपा उमेदवाराला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन बंदर व मत्स्यविकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी वेतोरे येथे बोलताना केले.

वेतोरे येथील गोगटे मंगल कार्यालयात भाजपा तर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे उपस्थित यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी आडेली जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठा व शिंदे शिवसेनेच्या विद्यमान सरपंच, आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी मेळाव्यास उपस्थित प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, प्रदेश सदस्य शरद चव्हाण, तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, जिल्हा सरचिटणीस साईप्रसाद नाईक, बाबा राऊत, प्रशांत खानोलकर, माजी जि. प. अध्यक्ष समिधा नाईक, गोविंद (दिपक) नाईक, वेतोरे पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, मठ संस्था चेअरमन सुभाष बोवलेकर, प्रणव वायंगणकर, आडेली सरपंच यशस्वी कोंडसकर, सुभाष खानोलकर, साईप्रसाद नाईक, विजय नाईक, हर्षद साळगावकर, महेश प्रभुखनोलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आडेली जिल्हा परिषद मतदार संघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातून किमान पाच हजार चे मताधिक्य आपल्या उमेदवाराला मिळाले पाहिजे. आपल्या गावाच्या विकासासाठी आपण लोकप्रतिनिधी निवडत असतो. पुढील पाच वर्षासाठी काम करणाऱ्या उमेदवारालाच संधी द्या. आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळे आपण विकासासाठी निधी देणाऱ्या, वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून लोकांना जोडून ठेवणाऱ्या भाजपा पक्षालाच संधी द्यावी असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी केले.

आडेली मतदारसंघातील हा पहिलाच मिळावा आहे. तरीही मेळाव्यासाठी मोठी उपस्थिती पाहून समाधान वाटले. यापुढे ही भेटीगाठी होत राहतील. आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन भाजपची सत्ता जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर आणायची आहे हे लक्षात ठेवा असे त्यांनी सांगितले. सर्वात जास्त जिल्हा परिषद उमेदवाराला मताधिक्याचे लीड देईल त्या बघायला जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू. पक्षासाठी जास्त काम त्यांना जास्त विकास निधी असेही धोरण असणार आहे. दरम्यान या आडेली मतदार संघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात असलेला उमेदवारच आम्ही देऊ असा विश्वासही पालकमंत्री राणे यांनी दिला.

दरम्यान जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी बोलताना सांगितले की, आम्हाला भाजप म्हणून वेगळे लढण्याची संधी द्या. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजप म्हणून आम्ही पण तयार आहोत. कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. निवडणुकीत चांगला रिझल्ट देण्याची आमची जबाबदारी आहे. पालकमंत्री म्हणून तुम्ही जिल्ह्यात केलेल्या कामाची पोच पावती मतदार मतदानाच्या माध्यमातून आपल्याला देणार असा विश्वास दळवी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश जामदार यांनी तर आभार साईप्रसाद नाईक यांनी मानले.