मोबाईल लंपास करणाऱ्या संशयिताचा पोलिसांना सुगावा

खेड (प्रतिनिधी)शहरातील तीनबत्तीनाका येथील एका लॉजमधून ५० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल लंपास करणाऱ्या के. रामचंद्र (४२, रा. कर्नाटक) या संशयिताचा येथील पोलिसांना सुगावा लागला आहे. त्याला गजाआड करण्यासाठी पोलिसांचे एक पथक बंगलोर येथे रवाना होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तीनबत्तीनाका येथील एका लॉजमध्ये मनोज शिवाजी पाटील वास्तव्यास आले होते. त्यांच्या मालकीचे दोन मोबाईल चोरीस गेल्याने येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. साडेतीन महिन्यानंतर या पसार संशयिताचा पोलिसांना थांगपत्ता लागला असल्याची माहिती समोर आली आहे.