बचत गटातील महिलांसाठी ग्रामपंचायत इमारतीत जागा उपलब्ध करण्याची सरपंचांची ग्वाही
सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘प्रेरणा प्रभागसंघ, कोलगाव’ च्या वतीने पंचायत राज संस्था आणि समुदाय आधारित संस्था यांचे अभिसरण अंतर्गत ‘प्रकल्प मूल्यमापन कार्यशाळा’ कोलगाव सोसायटी सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश प्रेरणा प्रभागसंघाच्या विविध प्रकल्पांचे मूल्यमापन करणे आणि पंचायत राज संस्थांच्या सहकार्याने भविष्यातील वाटचाल निश्चित करणे हा होता.
या महत्त्वपूर्ण कार्यशाळेला कोलगावचे सरपंच संतोष राऊळ व ग्रामविकास अधिकारी अरुण जाधव, कुणकेरीच्या सरपंच श्रीम. सोनिया सावंत आणि उपसरपंच सुनील परब, कारिवडेच्या सरपंच श्रीम. आरती माळकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक माळकर आणि आंबेगावचे उपसरपंच रमेश गावडे आदी उपस्थित होते.
मार्गदर्शनासाठी कुडुंब श्री, केरळ राष्ट्रीय संसाधन संस्थेच्या मेंटॉर श्रीम. गिरिजा संतोष या उपस्थित होत्या. तर तालुका अभियान कक्षातून BM MIS श शिवानंद गवंडे यांनीही कार्यशाळेत सहभाग घेतला. प्रेरणा प्रभागसंघाच्या कार्याची धुरा सांभाळणारे DRP श्रावणी वेटे, BRP प्राची राऊळ, प्रभागसंघ अध्यक्ष सविता कासार, सचिव क्षितिजा, कोषाध्यक्ष लीना आलमेडा आणि कार्यकारी समिती सदस्य तसेच सर्व LRP, CRP, लिपिका, बालसभा व अक्षर ज्योती प्रकल्पाचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला प्रार्थना आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. प्रभागसंघ अध्यक्ष श्रीम. सविता कासार यांनी सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन आदराने स्वागत केले.
तर DRP श्रीमती श्रावणी वेटे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले, ज्यात प्रकल्पाची उद्दिष्ट्ये आणि आतापर्यंतच्या कामाचा आढावा सादर करण्यात आला. यानंतर, मान्यवरांनी प्रकल्पांतर्गत केलेल्या विविध उपक्रमांच्या प्रदर्शनीला भेट देऊन कामाची माहिती घेतली.
यावेळी विविध प्रकल्पांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.
म्हारकटेवाडी बालसभा, आंबेगाव प्रतिनिधी – कु. प्रथमेश कडव आणि विद्या जंगले.
लय भारी बालसभा, कारिवडे प्रतिनिधी – सानिका सावंत, कावेरी आणि विठ्ठल सकपाळ.
अक्षर ज्योती उपक्रम लाभार्थी – श्रीमती विनिता जाधव आणि गंगा जाधव.
LRP म्हणून हर्षदा कारीवडेकर, साक्षी राऊळ, वेदिया सावंत आणि रेखा डंकी यांनीही आपले अनुभव कथन केले.
सरपंचांची महत्त्वपूर्ण घोषणा:
उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रेरणा प्रभागसंघाच्या कामाचे आणि लावलेल्या प्रदर्शनीचे तोंडभरून कौतुक केले.
याप्रसंगी बोलताना कोलगावचे सरपंच संतोष राऊळ यांनी बचत गटातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीत बचत गटातील महिलांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल.” त्यांच्या या घोषणेमुळे महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाला मोठा हातभार लागणार आहे.
प्रभाग समन्वयक अभय भिडे यांनी प्रेरणा प्रभागसंघ व उमेद अभियानाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर आणि सहभागींचे आभार मानले. शेवटी, वंदे मातरम राष्ट्रगीताने या यशस्वी कार्यशाळेची सांगता झाली.












