राजापूर शहरातील जाचक पुररेषेचे फेरसर्वेक्षण करावे

भाजपा तालुका अध्यक्ष मोहन घुमे यांचे खा. नारायण राणे यांना निवेदन :
राजापूर (प्रतिनिधी): पावसाळी हंगामामध्ये अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्यामुळे शहरात सातत्याने निर्माण होणाऱ्या पुर स्थितीच्या अनुषंगाने लघुपाटबंधारे विभागाने नवीन पूररेषा आखली आहे. सद्यस्थितीत ज्या भागात पुराचे पाणी पोहोचते त्यापेक्षा कितीतरी पट उंच ठिकाणी पूररेषा निश्चित करण्यात आली असून ती शहर विकासामध्ये अडसर ठरत आहे. शहर आणि बाजारपेठेच्या विकासाच्या मुळावर येणारी नवी पूररेषा शहरवासियांची डोकेदुखी ठरत आहे. नव्याने निश्‍चित करण्यात आलेली ही पूररेषा चुकीची असून शहरवासियांसह नगर परिषद प्रशासनाला विश्‍वासात घेवून या पूररेषेचे फेरसर्व्हेक्षण करण्यात यावे अशी मागणी भाजपचे राजापूर दक्षिण मंडळ तालुकाध्यक्ष मोहन घुमे यांनी केली आहे. याबाबतचे एक निवेदन घुमे यांनी रत्नागिरी-सिंधूदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांना गुरूवारी रत्नागिरी येथील जनता दरबारात दिले आहे.
यावेळी चर्चा करताना खा. राणे यांनी राजापूर शहराच्या पूररेषेचा प्रश्‍न मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याच् श्री. घुमे यांनी सांगितले.
राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांना दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर येवून पूराच्या पाण्याचा शहेराला वेढा पडतो. गेल्या कित्येक वर्षापासून पावसाळ्यामध्ये सातत्याने शहरामध्ये पूरस्थिती राहीली आहे. 1981, 1983 दरम्यान, आलेल्या मोठ्या पूरस्थितीनंतर शहरामध्ये पूररेषा निश्‍चितीचा मुद्दा चर्चेत आला. त्यानंतर, प्रशासनाकडून सर्व्हेक्षण होवून शहरामध्ये पूररेषा निश्‍चित करण्यात आली आहे. 2008 मध्ये निश्‍चित करण्यात आलेल्या पूररेषेचे फेरसर्व्हेक्षण होवून पुन्हा 2022 मध्ये नवीन पूररेषा निश्‍चित करण्यात आली आहे. नव्याने म्हणजे 2022 मध्ये पूररेषा निश्‍चित करताना आगामी सुमारे शंभर वर्षातील संभाव्य पूरस्थितीचा विचार करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्याच्यातून, ज्या भागामध्ये पूराचे पाणी पोहचत नाही त्या भागाचाही पूररेषेमध्ये समावेश झालेला आहे. त्यातून, निश्‍चित करण्यात आलेली पूररेषा शहर विकासामध्ये अडचणीची ठरत आहे. सद्यस्थितीचा विचार करता पूरस्थितीला कारणीभूत असलेला अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा शासनाच्या विविध योजनांमधून उपलब्ध झालेल्या निधीसह लोकसहभागातून निधी उभारून गाळ उपसा करण्यात आला आहे. या गाळ उपशानंतर पूरस्थितीची तीव्रता कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून 2022 मध्ये निश्‍चित करण्यात आलेली पूररेषा प्रथमदर्शनी चुकीची वाटत असल्याचे श्री. घुमे यांनी खासदार श्री. राणे यांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे 2022 मध्ये निश्‍चित करण्यात आलेल्या राजापूर शहरातील पूररेषेचे फेरसर्व्हेक्षण व्हावे, फेरसर्व्हेक्षण होत असताना स्थानिक लोक, लोकप्रतिनिधी यांना विश्‍वासात घेवून, लोकांच्या हकरती मागवून त्यावर विचारविनिमय होवून नव्याने पूररेषा निश्‍चित व्हावी अशी मागणी श्री. घुमे यांनी या निवेदनाद्वारे खासदार श्री. राणे यांच्याकडे केली आहे.