नाकाबंदी, तपासणी आणि पोलिसांचा पहारा; रत्नागिरीत नववर्षाच्या जल्लोषावर पोलिसांची करडी नजर

रत्नागिरी : 
३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देताना रत्नागिरीत झालेल्या नववर्षाच्या जल्लोषावर पोलिसांनी ‘कडक वॉच’ ठेवला होता. थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी झालेली गर्दी आणि संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. शहरात पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेषतः वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
​शहरातील मुख्य प्रवेशद्वार आणि संवेदनशील ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पोलिसांनी विशेष नाकाबंदी केली होती. यामध्ये मारुती मंदिर, पर्यटकांचे आकर्षण असलेले भाटे चेक पोस्ट, परटवणे रोड आणि साळवी स्टॉप यांसारख्या महत्त्वाच्या नाक्यांवर पोलीस तैनात करण्यात आले होते. या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. विशेषतः मद्यपान करून वाहन चालवणारे (Drunk and Drive), वेगाने गाडी चालवणारे आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी ‘ब्रेथ ॲनालायझर’चा मोठ्या प्रमाणावर वापर केला. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे नववर्षाचे स्वागत उत्साहात पार पडल्याचे वृत्त आहे.