कौटुंबिक वादातून एकावर कोयत्याने हल्ला 

चौकुळ येथील प्रकार : गुन्हा दाखल

आंबोली: मुलांच्या वादातून झालेल्या वादावादीचे पर्यावसान रक्तरंजित हाणामारीत झाल्याची घटना नुकतीच घडली. मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बाळासाहेब पवार (३४) यांच्यावर त्यांच्याच नातेवाईकांनी कोयत्याने हल्ला केला. या प्रकरणी आंबोली पोलीस चौकीत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळासाहेब पवार यांचा मुलगा ‘रुद्र’ याला त्यांचे चुलत सासरे नवनाथ जाधव यांनी मारहाण केली होती. आपल्या मुलाला का मारले, याचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब पवार हे नातेवाईकांकडे गेले होते. मात्र, तिथे वादाला तोंड फुटले आणि त्याचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले.

या वादादरम्यान संशयित आरोपी परिघा एकनाथ पवार (४५), विशाल एकनाथ पवार (२३), छायाबाई नवनाथ जाधव (४५) आणि किरण नवनाथ जाधव (२२) यांनी बाळासाहेब यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात विशाल पवार याने हातातील कोयत्याने बाळासाहेब यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार चुकवताना बाळासाहेब यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. याच वेळी किरण जाधव याने बाळासाहेब यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर प्रहार करून त्यांना जखमी केले.

जखमी बाळासाहेब पवार यांनी या प्रकरणी आंबोली पोलीस चौकी गाठून तक्रार दिली. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून सध्या हे सर्व संशयित केगदवाडी-चौकुळ येथे वास्तव्यास आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस हवालदार गलोले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.