जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

मंगळवारी जिल्हा परिषदसाठी ५ तर पंचायत समिती साठी ८ अर्ज दाखल

बुधवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस

सावंतवाडी । प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सावंतवाडी तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

मंगळवारी तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघासाठी एकूण ५ तर पंचायत समिती मतदार संघासाठी एकूण ८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

सावंतवाडी तालुक्यात ९ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि १८ पंचायत समितीच्या जागासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ९३ तर पंचायत समितीसाठी १५२ जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. उद्या, २१ तारीख उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या अर्जांमध्ये ​कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग आणि नुकतेच पक्षात दाखल झालेले मायकल डिसोझा यांनी अर्ज दाखल केले आहेत. एकाच मतदारसंघातून भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांनी अर्ज भरले असले तरीही नेमका एबी फॉर्म कोणाला मिळतो यावर अधिकृत उमेदवार ठरणार आहे.

​दुसरीकडे, माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपकडून विक्रांत सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रेश्मा सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून विक्रांत सावंत,​ कोलगांजिल्हा परिषद मतदार संघातून महेश सारंग व मायकल डिसोझा, माडखोलमधून
सौ. सुप्रिया मडगावकर तर मळेवाड मतदारसंघातून प्रियांका नारोजी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

तर ​पंचायत समिती सदस्य पदासाठी
​कलंबिस्त येथून चंद्रकांत राणे, प्रशांत देसाई, ​न्हावेलीमधून मोहन पालेकर, रमेश निर्गुण, ​आंबोली मतदार संघातून अच्युत गावडे, मायकल डिसोजा यांनी उमेदवारी दाखल केली.
तसेच ​कोलगावमधून गौरी धुरी,​माजगावमधून संजय कानसे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

जिल्ह्यात या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. ठरलेल्या सूत्रानुसार, जिल्हा परिषदेच्या ९ जागांपैकी भाजप ६ तर शिवसेना ३ जागा लढवणार आहे. पंचायत समितीच्या १८ जागांसाठी ९-९ असा समसमान फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.

​काही जागांवर भाजपने तर काही ठिकाणी शिवसेनेने दावा केल्याने अधिकृत उमेदवारी निश्चित न झाल्याने अनेकांनी शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज दाखल केलेले नाहीत. बुधवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नेमके कोणते चेहरे रिंगणात येतात आणि अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर किती जण निवडणूक लढवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.