खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके

खेड(प्रतिनिधी) पावसाळा काही दिवसांवरच येवून ठेपला आहे. यापार्श्वभूमीवर अतिवृष्टीदरम्यान उद्भवणाऱ्या
नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने येथील जगबुडी नदीकिनारी सोमवारी आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली.
 नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी व विसर्जन कट्टा पथकातील सदस्य उपस्थित होते. अतिवृष्टीदरम्यान जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर पुराचे पाणी बाजारपेठेत घुसून एकच हाहाकार उडतो. या पुराच्या पाण्यात नदीकाठचे रहिवासी अडकून पडतात. या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी चेतन विसपुते, प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली जगबुडी नदीपात्रात होडीच्या सहाय्याने प्रात्यक्षिके घेण्यात आली.
नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी व विसर्जन कट्टा पथकातील सदस्यांना आपत्तीबाबतचे धडे देण्यात आले. जीवितहानीसह वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने कोणकोणत्या उपाययोजनांचा अवलंब करायचा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.