ब्रिज पाडलेले नसताना, आणि अवजड वाहतूक सुरू असताना फक्त एसटी वाहतूक बंद का ?
जि.प./पं.स. उमेदवार व स्थानिक नेते सुशेगात ! मतदानावर परिणाम होण्याची शक्यता !
ब्रिज पाडले तरी, एसटी वाहतूक सुरक्षित पर्यायी मार्गाने चालू ठेवा– विद्यार्थी, पालकांची आग्रही मागणी !
फोंडाघाट / कुमार नाडकर्णी— हसणे जी दाजीपूर पासून फोंडाघाट हायस्कूल– कॉलेजमध्ये येणाऱ्या, सुमारे १००/१५० मुला- मुलींना एसटी वाहतूक, गेले वीस-पंचवीस दिवस बंद केल्यामुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. जि प. आणि पं. स. निवडणुकीच्या तिकिटांसाठी आणि भागाच्या विकासावर भाष्य करीत बंडखोरी करून नाराजी व्यक्त करणारे उमेदवार व स्थानिक प्रतिनिधी सुशेगात आहेत. त्यामुळे मतदारामध्ये तसेच विद्यार्थी- पालक – रुग्ण- ग्रामस्थ आणि व्यापारी यांचे मध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे.याचा राग म्हणून मतदारांचा रोष मतदानावर होण्याचा संभव आहे. निवडणुक निकालाच्या दुसऱ्या दिवशी ब्रिज नक्की पाडणार असल्याचे, संकेत मिळत आहेत. मात्र ब्रिज पाडला तरी, सक्षम पर्यायी मार्गाने एसटी वाहतूक कायमस्वरूपी सुरू ठेवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा विद्यार्थी, पालक, व्यापारी आणि ग्रामस्थांनी दिला आहे …
घाट मार्गे आजही कंटेनर, ट्रॉलर, चिरा व वाळू सहली च्या गाड्या, व्होल्व्हो इत्यादी अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. मग एसटी वाहतूकच बंद का ? यामागे प्रशासनाच्या तीन विभागातील समन्वयाचा सावळा – गोंधळ दिसून येत आहे. एसटी प्रशासनाचे देशमुख साहेबांनी, ग्रामस्थांनाच बांधकाम विभागाचे ना हरकत पत्र आणण्यास सांगितल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. तर डेप्यु. इंजि. प्रभू मॅडम यांनी जिल्हाधिकारी यांनीआदेश काढल्याचे सांगून हात वर केले आहेत. मात्र स्वतःच्या निगराणीखाली ग्रामपंचायतीने बांधलेला संरक्षक बांधाला वगळून पर्यायी मार्ग सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सक्षम केल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे ….
आज एसटी च्या प्रशिक्षण वाहनाद्वारे वाहतूक निरीक्षक गोरे यांनी पर्यायी रस्त्याची पाहणी व वाहन चालवून तपासणी केली. एसटी वाहतूक या मार्गावरून सुरक्षित आहे, असा अहवाल ते देतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व एसटी वाहतूक कायम स्वरूपात उद्यापासून सुरू होईल अशी खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याकरिता स्थानिक प्रतिनिधी यांचा प्रशासनावर रेटा आणि प्रशासनाचा ताळमेळ बसणे अपेक्षित आहे. पुन्हा एसटी बंद केल्यास व्यापारी पेठेवर होणारा परिणाम,विद्यार्थ्यांची परीक्षा आणि शैक्षणिक नुकसान, तसेच ग्रामस्थांना होणारा मनस्ताप या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे…











