पेंडखळे पंचायत समिती गणात प्रफुल्ल सुर्वे यांची अपक्ष उमेदवारी; उच्चशिक्षित नेतृत्वामुळे प्रस्थापितांसमोर आव्हान

राजापूर (वार्ताहर): पेंडखळे पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत प्रफुल्ल हनुमान सुर्वे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. मुंबईतील उच्च पगाराची नोकरी सोडून समाजकार्यासाठी गावाकडे वळलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने सर्वसामान्यांच्या नजरा आता या लढतीकडे लागल्या आहेत.
उच्च शिक्षण आणि दांडगा अनुभव
प्रफुल्ल सुर्वे यांचे शिक्षण BSc आणि MSc झाले असून सध्या ते LLB च्या शेवटच्या वर्षाला आहेत. मुंबईतील एका अग्रगण्य कंपनीत कामाचा अनुभव असतानाही, मागील १०-१२ वर्षांपासून त्यांनी पेंडखळे पंचक्रोशीत स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. गेल्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या वतीने लढताना त्यांनी १२६९ इतकी लक्षणीय मते घेतली होती. निसटता पराभव होऊनही खचून न जाता त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले, ज्याची पावती आज त्यांना मिळणाऱ्या जनप्रतिसादातून दिसत आहे.
नदी पुनरुज्जीवन : एक महत्त्वाकांक्षी ‘ड्रिम प्रोजेक्ट’
पेंडखळे पंचक्रोशीतील अनेक धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक शिक्षण यांचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागात करून त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्याचा मानस आहे. पेंडखळे ते भालावली दरम्यानची नदी पावसाळ्यानंतर कोरडी पडते. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सुर्वे यांनी ‘नदी पुनरुज्जीवन’ हा आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प (Dream Project) जाहीर केला आहे. नदीतील गाळ काढणे आणि ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडवण्याचा त्यांचा मानस आहे. याची सुरुवात म्हणून त्यांनी पेंडखळे वठारवाडीतील नदी पात्रातील गाळ उपसा करण्यासाठी विशेष सहकार्य करून आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे.
बेरोजगारी आणि शिक्षणावर विशेष भर
राजापूर-लांजा भागातील तरुण शिकूनही बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम मिळवून देणे आणि ग्रामीण भागातील मुलांमध्ये क्षमता असूनही केवळ मार्गदर्शनाअभावी ते स्पर्धा परीक्षेत मागे पडतात, ही उणीव भरून काढण्यासाठी ‘MPSC मार्गदर्शन केंद्र’ उभारण्याचा त्यांचा मानस आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून आरोग्य, पाणी आणि दळणवळणाचे प्रश्न सोडवण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांच्या साठी मार्गदर्शन केंद्र व सहकार्य करण्याचे प्रयत्न आहेत. आरोग्य सेवा, बाल शिक्षण, पाणी, दळण वळण साधने,मूलभूत सुख सुविधा,असे अनेक प्रश्न समोर आहेत. यासाठी सुयोग्य व्यवस्था निर्माण करण्याचा मानस आहे. उच्च शिक्षित असल्याने आधुनिक पद्धतीनचा अवलंब करून शाश्वत विकासाचे त्यांचे स्वप्न आहे.
लोकसंग्रह आणि वाढता पाठिंबा
सुर्वे यांचा मनमिळावू स्वभाव, प्रामाणिकपणा आणि प्रशासकीय कामांची जाण यामुळे पेंडखळे गणातील ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण आहे. भाजपच्या माध्यमातून गावात मोठा निधी खेचून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. आता अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्याने सुशिक्षित मतदारांचा कल त्यांच्याकडे झुकताना दिसत असून, या निवडणुकीत ते ‘जायंट किलर’ ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.