राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे मालगुंड येथे लोगो अनावरण संपन्न

राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे मालगुंड येथे लोगो अनावरण संपन्न

रत्नागिरी: कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह (लोगो) अनावरण रविवारी, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तथा महाराष्ट्र साहित्य परिषद रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा मा. सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते हे अनावरण पार पडले.
हे साहित्य संमेलन दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मांडकी पालवण येथील संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर संपन्न होणार आहे. याप्रसंगी बोलताना सौ. शिल्पाताई सुर्वे म्हणाल्या की, ग्रामीण, कृषी आणि सहकार या ग्रामीण भागाच्या जिव्हाळ्याच्या तीन विषयांवर एकत्रितपणे साहित्य संमेलन आयोजित करण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे. हा उपक्रम स्तुत्य असून सर्व साहित्यप्रेमींनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तत्पूर्वी, रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ. शिल्पाताई सुर्वे यांचा साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने गौरव करण्यात आला.
या सोहळ्याला मालगुंड गावच्या सरपंच मा. सौ. श्वेता थेऊर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नियोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह निखिल चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण तसेच कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर उपस्थित होत्या. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी तीन दिवसांच्या या संमेलनात विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असून, आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या संमेलनाकडे लागले आहे.