सावंतवाडी रेल्वे स्थानकसमोरील एटीएम बंद केल्याने ग्राहकांची गैरसोय

न्हावेली । प्रतिनिधी : मळगांवस्थित सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोरील असलेले बँक ऑफ इंडियाचे एटीएम अचानकपणे बंद करण्यात आल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांची ही गरज लक्षात घेता याठिकाणी पुनश्च एटीम मशीन लवकरात लवकर बसवावे, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर बँक ऑफ इंडियाचे एटीएम होते. मध्यंतरी काही महिने ते बंद होते. त्यानंतर अलिकडेच पुन्हा ते सुरु करण्यात आले होते. मात्र, आता ते बंद करून पूर्णतः तेथून हलविल्याने बँक ग्राहकांची तसेच रेल्वे मधून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरु असते. यावेळी प्रवाशांना पैशांची गरज भासल्यास या एटीएम मधून पैसे काढता येत होते, मात्र ते हटविल्याने या रेल्वे प्रवाशांना तसेच परिसरातील एटीम धारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. येथून जवळपास फक्त मळगाव बाजारपेठेत जिल्हा बँकेचे एक एटीम आहे. ते वगळता रेल्वे स्थानकापासून जवळच्या भागात तळवडेशिवाय कोठेही एटीम नाही.
त्यामुळे कोणाला पैशांची अचानक गरज भासल्यास येथून ६ ते ७ किलोमीटर तळवडे येथे जाण्याशिवाय पर्याय नाही. यात लोकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. हे लक्षात घेता याठिकाणी एटीम असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागणी व सोयीसाठी हे बंद केलेले एटीएम पुन्हा सुरु करावे, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.