“हजारो भाविकांच्या साक्षीने रंगला श्रद्धेचा उत्सव; भुईबावड्यात शिमगोत्सवाची दिमाखदार सांगता

रवळनाथाच्या जयघोषात न्हाऊन निघाली भुईबावडा नगरी; हजारो भाविकांची उपस्थिती

पंधरा दिवसांच्या शिमगोत्सवात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा सुरेख संगम

स्वप्निल कदम (भुईबावडा) :भुईबावडा येथील प्रसिद्ध शिमगोत्सवाची सरत्या खेळाने दिमाखदार सांगता झाली. तब्बल पंधरा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची भाविकांना वर्षभर प्रतीक्षा असते. नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या श्री देव रवळनाथ आणि इतर देवतांच्या दर्शनासाठी, नवस बोलण्यासाठी आणि आपले साकडे घालण्यासाठी हजारो भाविक या काळात भुईबावड्यात दाखल झाले होते.

वर्षानुवर्षे या उत्सवाचे स्वरूप अधिक भव्य होत असून भाविकांची गर्दीही दरवर्षी वाढताना दिसून येते. हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी पालखी मिरवणूक हा उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरला. “रवळनाथाच्या नावानं चांगभलं” या जयघोषाने संपूर्ण भुईबावडा नगरी दुमदुमून गेली होती.

गावातील मानकरी व ग्रामस्थांच्या अचूक नियोजनामुळे उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. होळीपासून सुरू झालेला हा उत्सव पंधरा दिवस भक्तांच्या श्रद्धेला प्रतिसाद देणारा ठरला. मुंबईस्थित माहेरवाशिणींसह स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवाचे दर्शन घेतले व ओटी भरली.

दशक्रोशीतील तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठा शिमगोत्सव म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने कोणतीही गैरसोय झाली नाही, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.

होळीचा मांड व पालखी मिरवणुकीचा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता. रांगोळ्यांनी सजलेल्या परिसरात सरत्या खेळानिमित्त होळी व पालखी पाहण्यासाठी आणि छायाचित्रे काढण्यासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण रात्र रंगली. म्हानांड या पारंपरिक लळीत नृत्याने सरत्या खेळाची सांगता झाली.

उत्सवाच्या निमित्ताने भुईबावडा बाजारपेठ परिसरात व्यापाऱ्यांनी दुकाने, हॉटेल्स व खेळण्यांचे स्टॉल्स उभारले होते. यामुळे व्यापाऱ्यांची हजारो रुपयांची उलाढाल झाली.

दरम्यान, उत्सवानंतर दुसऱ्याच दिवशी गावातील सत्यम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवून होळी मांड परिसरातील प्लास्टिक कचरा उचलत परिसर स्वच्छ केला. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

एकूणच, परंपरेने चालत आलेल्या या शिमगोत्सवात गावकऱ्यांनी प्रथा, रितीरिवाज, शिस्त व शांततेचा सुंदर संगम राखत उत्सव यशस्वी केला. पंधरा दिवसांच्या या उत्सवातून भाविकांनी वर्षभर पुरेल असा आनंद आणि देवाचे आशीर्वाद घेऊन समाधान व्यक्त केले.