समाजात निरपेक्ष हेतूने काम करणारी माणसे दुर्मिळ : दयानंद गवस 

प्रवीण भोसले व शेखर पाडगांवकर यांना ‘कोमसाप’चे स्मृती पुरस्कार प्रदान

राजकारण आणि समाजकारणातील निष्कलंक प्रवासाचा गौरव 

सावंतवाडी । प्रतिनिधी : समाजात निरपेक्ष हेतूने काम करणारी माणसे दुर्मिळ होत चालली असून माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि निवृत्त कामगार कल्याण अधिकारी कीर्तनकार शेखर पाडगांवकर यांच्याकडून तरुणांनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन निवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी केला. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव केला.

कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), शाखा सावंतवाडीच्या वतीने आयोजित दिमाखदार सोहळ्यात या दोन्ही मान्यवरांना स्मृती पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मळगाव इंग्लिश स्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस बोलत होते.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना ‘स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृती पुरस्कार’ (सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल), तर शेखर पाडगांवकर यांना ‘स्व. ॲड. दीपक नेवगी स्मृती पुरस्कार’ (सामाजिक, आध्यात्मिक व विधी क्षेत्रातील योगदानाबद्दल) देऊन गौरविण्यात आले.

*कोकणच्या हितासाठी तडजोड केली नाही – प्रवीण भोसले*

सत्काराला उत्तर देताना प्रवीण भोसले भावूक झाले. ते म्हणाले, “जनतेच्या साथीमुळे मी आमदार आणि मंत्री झालो. जनरल जगन्नाथराव भोसले, प्रतापराव भोसले, भाईसाहेब सावंत आणि जयानंद मठकर अशा दिग्गजांचे मार्गदर्शन मला लाभले. राजकारणात असताना अनेकदा पक्षश्रेष्ठींना मान्य नसतानाही मी कोकणच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ठाम भूमिका घेतल्या. कोकणच्या हितासाठी घेतलेल्या या भूमिकांमुळे मी राजकीयदृष्ट्या कदाचित मागे पडलो असेन, परंतु त्याबद्दल मला तिळमात्र दुःख नाही.” आजचा पुरस्कार हा पुढील कार्यासाठी ऊर्जा देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.

*पुरस्कार म्हणजे निरपेक्ष कार्याची पोचपावती – शेखर पाडगांवकर*

“आजचा सोहळा हा माझ्यासाठी अद्वैत सोहळा आहे. आयुष्यभर जे निरपेक्ष काम केले, त्याचे फळ आज मिळाले असल्याची माझी भावना आहे,” असे मत शेखर पाडगांवकर यांनी व्यक्त केले.

या सोहळ्याला कर्नल सुभाष भोसले, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे सचिव आर. आर. राऊळ, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मनोहर राऊळ, कोमसाप जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, सावंतवाडी शाखा अध्यक्ष दीपक पटेकर, सदस्य राजू तावडे, अभिमन्यू लोंढे, प्रा. सुभाष गोवेकर यांसह राजकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक पटेकर यांनी केले, सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी तर आभार राजू तावडे यांनी मानले.