रत्नागिरी जिल्हा कृषी सल्ला: पुढील पाच दिवस हवामान कोरडे; आंबा व काजू बागांची काळजी घेण्याचे आवाहन

रत्नागिरी: प्रतिनिधी प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक ११ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सुरुवातीचे दोन दिवस तापमानात किंचित वाढ होऊन १३ एप्रिलपासून ती घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आंबा बागायतदारांसाठी विशेष सूचना हापूस आंब्याची काढणी सुरू असलेल्या भागात शेतकऱ्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतरच काढणी करावी, जेणेकरून फळांचे तापमान नियंत्रित राहून ‘साका’ होण्याचे प्रमाण कमी होईल. फळे काढताना ८० ते ८५ टक्के पक्वतेची फळे ‘नूतन’ झेल्याच्या साहाय्याने देठासह काढावीत. फळकूज रोगाच्या नियंत्रणासाठी काढलेली फळे ५० अंश सेल्सिअस तापमानाच्या उष्ण जलात (०.०५% पोटॅशियम मेटाबायसल्फाईट) १० मिनिटे बुडवून मगच पिकायला ठेवावीत. तसेच, फळमाशीपासून संरक्षणासाठी प्रति एकर २ रक्षक सापळे लावण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

काजू व इतर पिकांचे व्यवस्थापन काजू बी दोन दिवसाआड गोळा करून स्वच्छ धुवावी आणि ३ दिवस उन्हात चांगली वाळवावी. वाढत्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी नवीन लागवड केलेल्या आंबा, काजू, सुपारी व नारळाच्या रोपांना शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांनी सावली करावी. मूग पिकात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास डायमेथोएट किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीनची फवारणी करावी. तसेच, हळद लागवडीसाठी एप्रिलअखेर ते मे महिना योग्य असल्याने जमिनीची पूर्वमशागत करून ठेवावी.

पशुधन व कुक्कुटपालन वाढत्या उष्म्याचा त्रास जनावरांना होऊ नये म्हणून त्यांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी चाऱ्यावर १% गूळ व ०.५% मीठ यांचे द्रावण शिंपडावे. दुपारच्या तीव्र उन्हात जनावरांना चरण्यास बाहेर सोडू नये. कुक्कुटपालनामध्ये शेडच्या छतावर गवत किंवा भाताचा पेंढा टाकून तापमान कमी ठेवावे आणि पक्षांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी खाद्य द्यावे.

जंगलात लागणाऱ्या वणव्यापासून बागांचे संरक्षण करण्यासाठी बागांभोवती वणवा निरोधक पट्टे काढण्याचे आवाहनही कृषी विद्यापीठाद्वारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी केंद्राशी संपर्क साधावा