आपल्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आई-वडील व शिक्षकांना विसरू नका ; आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
वेंगुर्ले : प्रतिनिधी
आज सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात राज्यात अग्रेसर आहे. कोकणचा विकास होणे आवश्यक असून विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्राचा विकास करावयाचा असेल तर उपलब्ध सुविधांचा योग्य उपयोग करून घ्या. तसेच विद्यार्थ्यांनी व्यवसायिक दृष्टिकोन ठेवून शिक्षण घ्यावे मात्र हे करत असताना “आपल्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आई-वडील व शिक्षकांना विसरू नका”. वाईट गोष्टींमध्ये न गुरफटता योग्य मार्ग निवडून आपल्या व देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी वेंगुर्ले येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दहावी – बारावी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शालांत परीक्षेमध्ये १०० टक्के निकाल लागलेल्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापकांचा वेंगुर्ले स्वामिनी मंडपम येथे सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार श्री.म्हात्रे बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन श्री.म्हात्रे यांच्या हस्ते झाले. सर्वप्रथम श्री.म्हात्रे व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , माजी जिल्हाध्यक्ष व माजी आ. राजन तेली, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, श्री. एस. एस. काळे, सचिव गुरुदास कुसगावकर, प्रदीप शिंदे, बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, एम.जी. मातोंडकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, सारिका काळसेकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, पप्पू परब आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रभाकर सावंत, राजन तेली यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणप्रेमी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी व वसंत तांडेल यांनी आभार मानले.
फोटो : वेंगुर्ले येथे विद्यार्थी व मुख्याध्यापक सन्मान कार्यक्रमात बोलताना ज्ञानेश्वर म्हात्रे.सोबत अन्य.











