राज्यात पावसाने ओढ दिल्याने एकीकडे शेती सुकण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे राज्यातल्या धरणांतील पाणीसाठय़ांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. आज राज्यातल्या सर्व धरणांतील पाणीसाठा 69.74 टक्क्यांवर आला आहे.
स्थिती अशीच राहिल्यास राज्यावर पाणीबाणी निर्माण होण्याची भीती आहे.
कोकणात मुबलक साठा
कोकणातील 11 मोठय़ा प्रकल्पांत 90.39 टक्के पाणीसाठा आहे तर मध्यम आकाराच्या 8 प्रकल्पांत 86.73 टक्के आणि लहान आकाराच्या 154 प्रकल्पांत 80 टक्के पाणीसाठा आहे.
संभाजीनगरात तळ गाठला
मराठवाडय़ात धरणातील पाण्याने अक्षरशः तळ गाठला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठय़ा आकाराची 44, मध्यम आकाराची 81 आणि 975 लहान आकाराची धरणे आहेत. या सर्व धरणांतील पाण्याची स्थिती अतिशय भीषण आहे.
संभाजीनगरमधील पाणीसाठा
मोठे प्रकल्प 37. 67 टक्के
मध्यम प्रकल्प 22. 82 टक्के
लहान प्रकल्प 21. 11 टक्के
गेल्या वर्षी 88 टक्के साठा
राज्यातील सर्व धरणांत मिळून मागील वर्षी याच दिवशी 88.15 टक्के पाणीसाठा होता, मात्र आज राज्यातील सर्व धरणांत मिळून 69.47 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहेत. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला तरच पाणीसाठा वाढेल. पावसाने ओढ दिल्यास भीषण परिस्थिती ओढवण्याची शक्यता जलसंपदा विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत.
मुंबईत चांगली स्थिती
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणांत मात्र समाधानकारक पाणीसाठा आहे.
वैतरणा 82.68 टक्के
मध्य वैतरणा 96.10 टक्के
भातसा 86.82 टक्के
मोडक सागर 95.76 टक्के
तानसा 99.72 टक्के








