मळगाव घाटीत चक्क र मुख्यमार्गावरच अवतरले ‘नागराज ‘
सावंतवाडी । प्रतिनिधी : श्रावण सुरू झाला की लगबग असते ती सणासुदीची. नागपंचमीच्या सणाला नागराजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण इच्छुक असतात तर मातीच्या प्रतिमेचे घरोघरी पूजन करीत शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या नागराजाचे एक प्रकारे आभारच मानले जातात.
मात्र, आज चक्क जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण पूजनासाठी लगबगीने घरी परतणाऱ्या भक्तमंडळींना भल्या मोठ्या नागराजाने दर्शन दिले. रेडी राज्य मार्गावरील मळगाव घाटीत धबधब्याच्या खालील भागात मुख्य मार्गावरच नागराज प्रगटले. मुख्य रस्त्यावर नागराज असल्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहनधारकांना तेथेच थांबून राहावे लागले.चक्क पाच ते दहा मिनिटे हा प्रकार सुरू होता. अखेर रस्ता ओलांडून नागराज झुडपात शिरले व साऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. चक्क तीन ते साडेतीन फूट लांब असलेल्या या किंग कोब्राच्या दर्शनामुळे काहीजण सुखावले तर काहीजणांची भीतीने गाळण उडाली. बुधवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. मळगाव पंचक्रोशीत या प्रकाराची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती.












