दापोली येथे स्वच्छ एसटी आणि स्वच्छ बस स्थानक या महाराष्ट्रातील पहिल्या प्रकल्पाचे करण्यात आले लोकार्पण

जमा कचरा पाठवण्यात येणार पुनर्वापर प्रकल्पाकडे

एसटी बस मध्ये बसवण्यात आली कचरा खाणारी पिशवी

दापोली l प्रतिनिधी : दापोली येथे स्वच्छ एसटी आणि स्वच्छ बस स्थानक प्रकल्प निवेदिता प्रतिष्ठान आणि दापोली एसटी आगार तर्फे संयुक्तपणे कार्यान्वीत झाला आहे.या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा चार सप्टेंबर रोजी दापोली एसटी स्थानक येथे संपन्न झाला.

या प्रसंगी दापोली आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या प्रकल्पाचे प्रमुख प्रशांत परांजपे, दापोली नगरपंचायाती च्या नगराध्यक्ष ममता मोरे , प्रवासी एसटी प्रेमी संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर,सतीश जोशी, श्री. मोरे, संदेश राऊत, दिनेश जैन,प्रा.अशोक निर्बाण, सहाय्यक वहातूक अधिक्षक मुनाफ राजापकर,प्रणव रेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या अंतर्गत प्रत्येक एसटी बस मध्ये एक कचरा खाणारी पिशवी चालाकाच्या केबिन च्या मागील बाजूला बसवण्यात आली आहे. या पिशवीतच प्रवाशांनी प्रवास करताना आपल्याकडील रिकाम्या पाण्याच्या व थंडपेयाच्या बाटल्या आणि खाऊचे रॅपर्स चा कचरा टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दापोलीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांनी निवेदिता प्रतिष्ठान आणि दापोली एसटी आगार यांचे अभिनंदन करून,महाराष्ट्रातील पहिला स्वच्छ एसटी आणि स्वच्छ बस स्थानक प्रकल्प माझ्या दापोलीतून सुरू होत असल्याचा अभिमान मला आहे.असे प्रतिपादन करून यासाठी सर्वतोपरी सहकार्‍याची हमी त्यांनी दिली.

आगार प्रमुख रेश्मा मधाळे यांनी निवेदिता प्रतिष्ठानमुळे स्वच्छता कार्यात राज्यात दापोली आगाराचा वेगळा ठसा उमटवणे शक्य झाल्याचे मत व्यक्त करून सदोदित सहकार्याची हमीही दिली.यावेळी बोलताना मधाळे यांनी प्रवाशांनी या व्यवस्थेचा लाभ घेऊन पर्यावरण संवर्धन कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.स्थानकावर प्लास्टीक बाटल्या व प्लास्टीक रॅपर्स टाकण्यासाठी दोन स्वतंत्र पिंजरे ठेवण्यात आले आहेत.बस स्थानकावरील या पिंज-यांचा प्लास्टीक कचरा टाकण्यासाठी प्रवाशांनी वापर करायचा आहे.त्याचप्रमाणे प्रवास करताना खाऊचे रॅपर्स आणि रिकाम्या बाटल्या खिडकीतून बाहेर अथवा गाडीत इतरत्र न टाकता एसटी मधील कचरा खाणा-या पिशवीतच टाकायचा आहे. असे आवाहनही आगार प्रमुख रेश्मा मधाळे यानी लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केले आहे.

*जमा कचरा जाणार पुनर्वापर प्रकल्पाकडे*

प्रत्येक गाडी दापोली बस स्थानकात परत आल्यावर कचरा खाणारी पिशवी बदलण्यात येणार आहे.या पिशवीत जमा होणारा आणि स्थानकावर जमा होणारा कचरा हा निवेदिता प्रतिष्ठान च्या माध्यमातून पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहीती प्रशांत परांजपे यांनी दिली. अशा पद्धतीचा स्वच्छ एसटी व स्वच्छ बस स्थानक प्रकल्प महाराष्ट्रात प्रथमच दापोली आगार येथे कार्यान्वीत झाल्याबद्दल आगार प्रमुख रेश्मा मधाळे यांचे परांजपे यांनी विशेष अभिनंदन केले. निवेदिता प्रतिष्ठानच्या वतीने प्लास्टीक बाटल्यांपासून बनवलेला बुके देऊन आगार प्रमुख रेश्मा मधाळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी किशोर फर्निचर मार्ट दापोलीचे दिनेश जैन ,पी.बी.गुरव अँण्ड कंपनी दापोलीचे पद्माकर गुरव ,आनंद फाऊंडेशन संचालित बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र दापोली, वराडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत क-हाड,रामराजेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य राणे मॅडम,रामराजेच्या वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक निर्बाण,ए.जी.हायस्कूल दापोलीचे मुख्याध्यापक सतीश जोशी सर ,नॅशनल हायस्कूल दापोलीचे मुख्याध्यापक मुल्ला सर,दापोली अर्बन बँक कॉलेजचे प्राचार्य जगदाळे,लोकमान्य विद्यालय दापोलीचे मुख्याध्यापक राऊत सर,ज्ञानदीप विद्यामंदिर दापोलीचे मुख्याध्यापक मोरे सर गुडघे गावचे पोलीस पाटील श्रीरंग दांडेकर ,निवेदिता प्रतिष्ठानचे विद्याधर ताम्हणकर ,अविनाश खुळे,महेश्वरी विचारे ,मराठी पत्रकार परिषद आणि प्रवासी एसटी प्रेमी संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर,जालगाव इंजिनिअरिंगचे सुहास मेहता आणि दापोली एसटी आगारातील सर्व अधिकारी ,चालक व वाहक आणि कर्मचारी तसेच एसटी च्या प्रवाशांचेही सहकार्य लाभले आहे.