
पोलिसांकडून पुढील कारवाई सुरु : टेम्पोत होती तीन गुरे : तरुणांनी ठरारक पाठलाग करत पकडला टेम्पो
मालवण | प्रतिनिधी : बेकायदा गुरे वाहतूक प्रकरणी मालवणात एक बोलेरो पिकअप गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. या गाडीतून बेकायदा गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच शहरातील काही तरुणांनी पाठलाग करून ही गाडी देऊळवाडा सागरी महामार्ग येथे अडवून पोलिसांना त्या ठिकाणी बोलवले. या प्रकरणी पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या गाडीवर यापूर्वी दोनवेळा गुरांची वाहतूक केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे समजते. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.
एका टेम्पो मधून बेकायदा गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मालवण मधील काही तरुणांनी पाठलाग करत देऊळवाडा सागरी महामार्ग येथे सकाळी हा टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता पूर्ण बंदिस्त केलेल्या या टेम्पोच्या आतमध्ये तीन गुरे दिसून आली. यामध्ये एक वासरू, एक बैल आणि एक म्हैस मिळून आले. या गाडीच्या चालकाकडे विचारणा केली असता त्याच्याकडून वेगवेगळी उत्तरे मिळाल्याने याठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर हा टेम्पो पोलीस ठाण्यात नेण्यात आला. यावेळी सीझर डिसोजा, ललित चव्हाण, अनिकेत फाटक, सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण, पंकज गावडे, पार्थ वाडकर, संदेश फाटक, शैलेश नामनाईक आदींचा समावेश होता. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरु आहे.
गुरांची वाहतूक करताना आढळलेल्या टेम्पोवर यापूर्वी दोनवेळा गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे समजते. ही गुरे बेळगाव मध्ये कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा आरोप उपस्थित तरुणांनी केला असून संबधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









