हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जाकादेवी रत्नागिरी येथे शौर्य प्रशिक्षण शिबिर

रत्नागिरी :  पूर्वीच्या काळी आपल्या देशात स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली जात होती. आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना महिलांचे असुरक्षितता दिवसेंदिवस वाढत आहे, यासाठी महिलांनी धर्माचरण करून आत्मबल वाढवण्यासमवेतच स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षितही झाले पाहिजे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे श्री. प्रकाश कोंडस्कर यांनी केले. तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशीतील मुलींसाठी आयोजित दि.3डिसेंबर रोजी शौर्य प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात 98 शिवीरार्थीने सहभाग घेतला होता. शिबिराचा उद्देश कु. सुवर्णा सकपाळ यांनी सांगितला.तर सूत्रसंचालन कु.मिथिला वाडेकर यांनी केले.

श्री प्रकाश कोंडस्कर पुढे म्हणाले जेव्हा असुरांचा प्रकोप वाढला, तेव्हा श्री दुर्गादेवीने सर्व असुरांचा नाश करून विजयादशमी साजरी केली. स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून शौर्य गाजवले, त्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. काळाची पावले ओळखून महिलांनी शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक दृष्टीनेही सक्षम होणे आवश्यक आहे. आपल्या ऋषीमुनींनी कठोर तपश्चर्या करून अखिल मानव जातीसाठी उपलब्ध केलेल्या ज्ञानाचा आपण जीवनात लाभ करून घेतला पाहिजे आणि भारतीय संस्कृतीनुसार आचरण केले पाहिजे असे सांगितले. यावेळी कु. सुवर्णा सकपाळ यांनी आपल्याकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून न बघता नम्रतेने बघणारा समाज निर्माण करायचा असेल तर आपल्या आचरणात पालट करायला हवा असे सांगितले.

कु. मिथिला वाडेकर यांनी आपल्याला आरामदायी जीवन जगण्याचे स्वातंत्र्य क्रांतिकारकांनी मिळवून दिले आहे. म्हणूनच आपण मातृभूमीसाठी वेळ देण्याचा निर्धार करूया, असे सांगितले. यावेळी सहभागी शिबिरामधून  माजी सरपंच सौ. माधवी संतोष गोताड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सौ. संस्कृती धामणे, कु. श्वेता जोशी, कु. गौरी गोगटे, कु.स्नेहा शेंडे आदींनी हा उपक्रम खरोखरच अत्यावश्यक
असल्याचे सांगितले.