मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियानाचा शुभारंभ
वेंगुर्ले | दाजी नाईक : खेळ हे आपले करिअर घडविण्यासाठी उत्तम माध्यम आहे. वेटलिफ्टींग खेळातील सातत्यपूर्ण कठोर मेहनत, अभ्यास आणि जिद्द यांच्या जोरावर आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल मिळविली आणि महाराष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार श्री शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालो. खेळाच्या माध्यमातूनच स्वतः आपल्याला महाराष्ट्र राज्यात प्रशासकीय सेवेची सुसंधी प्राप्त झाली असून , अभ्यास आणि खेळातून करिअरच्या विविध सुसंधी उपलब्ध आहेत हे जाणून घेवून, विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी ध्येयाची आखणी करावी असे प्रतिपादन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर पाल हायस्कूल, अणसुर या शाळेच्या ” रंगशिशिर” स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी शालेय समिती सदस्य दिपक गावडे, मुख्याध्यापक राजेश घाटवळ, स्नेहसंमेलन प्रमुख चारुता परब, शिक्षक अक्षता पेडणेकर, विजय ठाकर, माजी विद्यार्थी स्वप्नील गावडे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी नृत्य, गायन, वादन, विविध संदेश देणाऱ्या नाटिका, विनोदी लघुनाट्य असे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले.
यावेळी,अणसूर पाल हायस्कूल येथे “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानाचाही शुभारंभ वेंगुर्ला तहसीलदार श्री.ओंकार ओतारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. विद्यार्थी व शाळा यांच्या सर्वागीण विकासासाठी ग्रामस्थ, पालक व माजी विद्यार्थी यांचे बहुमोल योगदान असते आणि या अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपल्या शाळांमध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. स्वागत व आभार विजय ठाकर यांनी मानले.











