रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धेत कोकण विभागातून श्रीरंग नाट्यसंस्थेच्या तथास्तु या नाटकाला प्रथम पुरस्कार मिळाला.सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – भाग्येश खरे,सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय – गोपाळ जोशी,उत्तम स्त्री अभिनय – सोनल शेवडे,उत्तम प्रकाश योजना – साईप्रसाद शिर्सेकर अशा चार वैयक्तिक पारितोषिकांसह नाटक अव्वल ठरले.रत्नागिरीतील उदयोन्मुख लेखिका राजश्री साने यांनी नाटकाचे लेखन केले आहे. नारायण धारप यांच्या कथेवर आधारित हे भयनाट्य आहे.
या नाटकाचा प्रयोग अंतिम फेरीमध्ये चंद्रपूर येथे दिनांक 7 मार्च रोजी सादर होणार आहे.यावर्षी चिपळूण येथे प्राथमिक फेरी झाल्यामुळे रत्नागिरीतील रसिकांना या नाटकाचा प्रयोग पाहता आला नाही.रत्नागिरीतील प्रेक्षकांसाठी शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता तथास्तु या नाटकाचा प्रयोग स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये आयोजित केला आहे. रत्नागिरीतील रसिकांनी आवर्जून या नाट्यप्रयोगास उपस्थित राहावे आणि संस्थेला,कलाकारांना शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन श्रीरंगचे अध्यक्ष भाग्येश खरे यांनी केले आहे.











