आदि शंकराचार्यांनी भारताच्या भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात एकात्मता दृढ केली

कुलसचिव प्रा.कृष्णकुमार पाण्डेय यांचे गौरवोद्गार

रत्नागिरी : जगद्गुरु आदि शंकराचार्य यांनी आपल्या जीवन कार्यातून भारताच्या भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील एकात्मता दृढ केली. याशिवाय आदि शंकराचार्यांनी आपल्या परिक्रमेतून भारतातील कानाकोपऱ्यात चैतन्य निर्माण केले. त्यामुळेच सर्वार्थाने जगद्गुरु शंकराचार्य म्हणजे भारताचे तन, मन, जीवन आहेत,असे गौरवोद्गार कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रा कृष्णकुमार पाण्डेय यांनी काढले. ते जगद्गुरु आदि शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

 

संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वां. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र, गोगटे- जोगळेकर महाविद्यालय, संस्कृत विभाग यांच्या सहयोगाने आयोजित चर्चासत्राला गोगटे- महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे व्यासपीठावर उपस्थित होते. नवी दिल्लीतील भारतीय भाषा समितीच्या आर्थिक साहाय्याने हे चर्चासत्र प्रथमच झाले. चर्चासत्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नाणिज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराजांच्या पाठशाळेतील वेदाध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चार करत वातावरण मंगलमय केले.

 

सकाळच्या उद्घाटन सत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. पाण्डेय म्हणाले की, ते म्हणाले की, भारताचा आत्मा, परंपरा, एकता, बल, अखंडता, तप, दर्शन, संस्कृती, संस्कार, सभ्यता, संयम,श्रद्धा, उदारता, स्वरूप, तत्त्व , वैभव, ज्ञान, कीर्ती, आत्मा, वाणी, गर्व, चिंतन हे जगद्गुरु आदि शंकराचार्य हे आहेत. आदि शंकराचार्य यांनी स्थापन केलेली चार पिठे, त्यांना देण्यात आलेले वेद व त्यांची केलेली सूत्रबद्ध योजना ही आदि शंकराचार्यांची दूरदृष्टी स्पष्ट करते, असे सांगितले. कुलसचिव पाण्डेय यांनी आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या बद्रिकाश्रमाचा ज्योती मठ, दक्षिणेला शृंगेरी मठ, पूर्वेला जगन्नाथपुरीचा गोवर्धन मठ आणि पश्चिमेला द्वारकेचा शारदा मठाचा उल्लेख केला. रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, भगवान परशुराम आणि आचार्य बाळकृष्ण दीक्षित या चार महान विभुतींचा आदरपूर्वक उल्लेख केला.

 

या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख प्रा. डॉ. कल्पना आठल्ये, व्याख्याते श्रीनिवास पेंडसे, उपकेंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी, रत्नागिरी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील ६० हून अधिक संस्कृत व आदि शंकराचार्य प्रेमी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनकर मराठे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. कश्मिरा दळी यांनी केले. डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले.