मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली मार्फत विशेष लोकन्यायालय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाकडे असलेली प्रलंबित प्रकरणे लोकन्यायामध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. या प्रकरणामधील पक्षकारांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. पक्षकारांनी विशेष सप्ताहामध्ये प्रकरणात संमती फाॅर्म भरुन दयावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मा. सुनिल गोसावी साहेब यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने २९ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान मा. सर्वोच्च न्यायालयात लोकन्यायालय सप्ताहाचे आयोजन केले आहे. रत्नागिरी जिल्हयातील एक प्रकरण मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सदरचे प्रकरण लोकन्यायालयामध्ये निकाली काढण्याबाबतचे निर्देश मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिले असून त्यांची यादी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांना ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे.
नाेटीसा मिळाल्यानंतर, त्या सुचीबध्द प्रकरणांमधील संबंधित पक्षकारांनी विशेष लोकअदालतीमध्ये तडजोडीने प्रकरण मिटविण्यासाठी संमती फाॅर्म भरु शकतात. पक्षकार किंवा त्यांच्या वकीलांनी त्यांचे संमत्ती फाॅर्म त्यांच्या संपर्क क्रमांक आणि ई-मेल पत्यांसह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्षरित्या सादर केल्या पाहिजेत. विशेष लोकन्यायालयापूर्वी त्यांच्या तडजोडीच्या चर्चेची तारीख पक्षकार आणि वकीलांना दिली जाईल. ते त्या बैठकीला प्रत्यक्षपणे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या लिंकवर व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहू शकतात.











