वैभव नाईकच लाचार : केसरकरांचा हल्लाबोल

वर्षाबाहेर रस्त्यावर ताटकळत राहायची सवय तुम्हाला

कोकणी माणसाच्या स्वाभिमानाला ललकारू नका

मागील वेळी अर्ज बाद झाला म्हणून वाचलात

सावंतवाडी । प्रतिनिधी : वर्षा बाहेर तासनतास उभा रहाणारा मी नाही. आमदारांचा सातत्याने अपमान होत असल्यानेच आम्ही स्वाभिमानाने बाहेर पडलो. कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. त्यामुळे कोकणी माणसाच्या स्वाभिमानाला ललकारू नका व उगाच कुणाला बदनाम करायची हिंमत करू नका. अन्यथा सगळं बाहेर काढावं लागेल असा गर्भीत इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आ. वैभव नाईक यांना दिला.

दरम्यान, मागच्यावेळी समोरील उमेदवाराचा अर्ज बाद झाला अन्यथा आज चित्र वेगळं असतं. मी त्यावेळी घेतलेल्या बंडाच्या भूमिकेमुळेच तुम्ही निवडून आलात हे विसरू नका. उगाच माझ्या वाटेला जाऊ नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत मला तुमच्या मतदारसंघात यावं लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, आम्ही आमदारांच्या स्वाभिमानासाठी बाहेर पडलो. कोकणी माणूस कधीही लाचार होणार नाही. मी कोणाकडूनही एक रुपया देखील घेतला नाही. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही शिर्डीला साईबाबांसमोर या व बोला, असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले.

आमदार हे अडीच लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आमदारांचा अपमान म्हणजे त्या मतदारांचा अपमान असतो. नारायण राणे यांनी मंत्री, मुख्यमंत्री असतानाही मला सन्मानाची वागणूक आम्हाला दिली. आमच्यातील संघर्ष हा वैचारीक होता. मात्र विकासाच्या मुद्द्यावर आम्ही नेहमीच एकत्र आलो. विकासाच्या व स्वाभिमानाच्या मुद्द्यावरच आम्ही पुन्हा भाजप सोबत गेलो. आमदार वैभव नाईक देखील आज आमच्यासोबत असू शकले असते. पण, त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे ते एकनाथ शिंदेंसोबत आले नाहीत‌ असा गौप्यस्फोट केसरकरांनी केला. स्व. बाळासाहेबांच्या विचारांसाठी आम्ही तो निर्णय घेतला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगूनच आम्ही निघालो. आम्ही लाचारी सहन करणारे नाही. वैभव नाईक यांनी आमच्यावर बोलू नये, आदित्य ठाकरेंनीही बोलू नये. मी साईबाबांचा भक्त आहे. त्यामुळे कुणाबद्दल तुम्ही बोलता याची नैतिकता बाळगा. आमची लढाई स्वाभिमानाची होती ती लढाई स्वाभिमानानं लढली आहे. त्यामुळे उगाच आरोप करू नका अन्यथा मला देखील सगळं बाहेर काढावे लागेल असा इशारा मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिला.

पैसे वाटले तर मग वैभव नाईक यांनी रोखले का नाही : दीपक केसरकर

पैसे ‘उबाठा’नेच वाटल्याचे लोकं म्हणत असल्याचाही आरोप

सावंतवाडी :  पैसै वाटले असे आमदार वैभव नाईक यांचे म्हणणे असेल तर त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना रोखले का नाही असा सवाल करतानाच लोक म्हणतात उबाठानेच पैसे वाटले असा आरोपही मंत्री दीपक केसरकर यांनी केला. वैभव नाईक यांनी अशाप्रकारे बोलून कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असा सणसणीत इशारा देत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देत वैभव नाईकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

ते म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. ए, बी.सी कॅटॅगरी करून पैसे वाटले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, कुणी पैसे वाटले याची आपल्याला कल्पना नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी एकलाही पैसै वाटले नाहीत. जर पैसे वाटले गेले तर वैभव नाईक यांनी ते रोखलं का नाही ? उलट उबाठा शिवसेनेनेच पैसै वाटले असं लोक सांगत आहेत असा हल्लाबोल दीपक केसरकर यांनी केला.