गुणवंत विद्यार्थी व दशावतार कलावंतांचा सन्मान

कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा यांच्या वतीने आयोजन

अमित खोत | मालवण : मालवण तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा यांच्यावतीने भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व दशावतार कला क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त दशावतारी कलाकार यांचा सन्मान सोहळा कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय कट्टा येथे संपन्न झाला.

स्वराज्याचे तोरण बांधताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत महत्वाची भूमिका बजावणारे हे भंडारी होते. भंडारी समाजाला खूप मोठा इतिहास आहे. मायनाक भंडारी आणि भागोजीशेठ कीर हे भंडारी समाजाचे खूप मोठे नेते होऊन गेले. त्यांनी आपल्या समाजाला मोठी ओळख निर्माण करून दिली. त्यांचे समाजासाठी खूप मोठे योगदान आहे. त्याच समाजाचे आपण सर्वजण वंशज आहोत. आपल्या समाजाच्या वंशजांचे स्मारक प्रत्येक जिल्ह्यात उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे व त्यांच्या कार्याचा वसा पुढे घेऊन जाण्याचे काम आपण सर्वांनी करूया. असे आवाहन अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी मालवण कट्टा येथे बोलताना केले.

यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज अध्यक्ष मामा माडये, आनंद वराडकर, सुनील नाईक, देवगड भंडारी समाज अध्यक्ष हेमंत करंगुटकर, वराडकर हायस्कूल मुख्याध्यापक संजय नाईक, भंडारी समाज कट्टा युवा अध्यक्ष गणेश वाईरकर, ऍड. प्रदीप मिठबावकर, निलेश गोवेकर, लक्ष्मण मुंडये, शाम वाक्कर, गावराई सुकळवाड भंडारी समाज अध्यक्ष बाबुराव मसुरकर, प्रवीण मिठबावकर, अशोक पराडकर, दिलीप वेंगुर्लेकर, सतीश वाईरकर, सपना पावसकर, श्रावणी नाईक, ऍड श्वेता तेंडुलकर वेंगुर्लेकर, गौरी नार्वेकर, तळगाव सरपंच लता खोत, सुरेश कांबळी, निलेश हडकर, मंगेश माडये, सतीश कांबळी, विद्याधर चिंदरकर, सुनील शिरोडकर, चंद्रकांत खोत, किशोर वाक्कर, अनिल पाटील, प्रदीप आवळेगावकर, जीजी वाईरकर, सुनील पोखरणकर, अजय मयेकर, प्रकाश सरमळकर, संतोष नागवेकर, योगेश पाटकर, सुरेंद्र जबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बांदिवडेकर पुढे म्हणाले की आज गुणवंत विद्यार्थी व नावलौकिक प्राप्त दशावतार कलाकार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन समाजाने त्यांचे मानसिक मनोबल वाढवण्याचे काम केले आहे. ज्याने तुम्हाला भविष्यात काम करताना प्रेरणा मिळेल. त्या आपल्या समाजाला आपण कधीही विसरू नका कारण आज मिळालेला सन्मान ही तुमच्या आयुष्यातील कार्याची खरी पोच पावती आहे. विद्यार्थ्यांसाठी लवकरच मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाईल अशी ग्वाही देत समाजाची अशीच एकजूट कायम ठेवत समाज जोमाने पुढे नेण्याचे काम करा. असे सांगितले.

भव्य दिव्य सत्कार समारंभात सुमारे 90 गुणवंत विद्यार्थी व 80 नावलौकिक प्राप्त दशावतार कलाकार यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कट्टा पंचक्रोशी भंडारी समाजाचे अध्यक्ष मामा माडये म्हणाले की आपण समाजाचे काहीतरी देणे लागत असतो ज्यावेळी आपण समाजासाठी काही करतो तेव्हा त्याची दखल घेऊन समाजही आपल्यासाठी काही ना काही तरी करतोच विद्यार्थी हे देशाचे पुढील भविष्य आहे. त्यामुळे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात अजून प्रगती करावी यासाठी समाजाने तुमच्या पाठीवर आज कौतुकाची थाप दिलेली आहे. जी तुम्हाला भविष्यात खूप मोठे होण्याची प्रेरणा देईल. भविष्यात कितीही मोठे झालात तरीही समाजाला मात्र कधीही विसरू नका. कारण समाज आहे तर आपण आहोत. हे लक्षात ठेवा.

दशावतार कलाकार यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात बोलताना पप्पू नांदोसकर म्हणाले की आम्ही नेहमीच समाजाचे खूप ऋणी आहोत. कारण आजपर्यंत आम्ही दशावतारी कला क्षेत्रात काम करताना अनेक सत्कार झाले. परंतु आजचा सत्कार हा कुटुंबाने केलेला सत्कार असून तो काळजाला भिडलेला सन्मान आहे. ज्याचे ऋण आम्ही कधी फेडू शकत नाही. तब्बल दोन वर्षानी समाजाच्या प्रेमापोटी मी रंगमंचावर प्रवेश करणार आहे. आमच्या कार्याची समाजाने घेतली दखल पुढे जोमाने काम करण्यास प्रेरणा देईल हे मात्र निश्चित.

यावेळी शाम वाक्कर, सुनील नाईक, गौरी नार्वेकर, ऍड. श्वेता तेंडुलकर वेंगुर्लेकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी प्रास्ताविक ऍड. प्रदीप मिठबावकर तर आभार संजय नाईक यांनी मानले.
रात्रौ याच कलाकारांमधून 27 कलाकारांनी संयुक्तरित्या ‘अगस्तायन’ हे बहारदार दशावतारी नाटक सादर केले. या नाटकाला भंडारी बांधवांसमवेत अन्य हजारो रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शविली तसेच युट्युब लाईव्हच्या माध्यमातून हजारो प्रेक्षकांनी लाभ घेतला व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भंडारी समाज बांधवानी मेहनत घेतली तसेच अनेक दात्यांनी कार्यक्रमाला आर्थिक सहकार्याचा हातभार लावला.