सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीत गुरुवारी ७५१ पैकी ४९५ उमेदवार उपस्थित: ४५० मैदानीसाठी पात्र

सिंधुनगरी | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग पोलीस भरतीच्या आजच्या तिसऱ्या दिवशी बोलावण्यात आलेल्या 751 उमेदवारांमधून 495 उमेदवार उपस्थित राहिले. यातील 45 उमेदवार अपात्र ठरले व 450 उमेदवार मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरले. आज शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पाऊस नसल्यामुळे या सर्व उमेदवारांच्या मैदानी चाचण्या पूर्ण करण्यास संधी मिळाली.

पोलीस भरती प्रक्रिया जिल्हा पोलीस दलाच्या नियोजनाप्रमाणे शिस्तबद्ध सुरू आहे. उमेदवारांची कोणतीही गैरसोय होत नसल्यामुळे शांतपणे व सुरळीतपणे ही प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांसोबत असलेली वाहने त्या वाहनांचे पार्किंग व उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था यामुळे अनेक उमेदवारांनी चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

आता प्रत्येक दिवशी 750 उमेदवारांना बोलावून त्यांची शारीरिक पात्रता व त्यानंतर मैदानी चाचणी पूर्ण करून घेण्याचे नियोजन जिल्हा पोलीस दलाने केले आहे. मैदानी चाचणीच्या वेळी पाऊस पडला नाही तर पोलिसांचे काम सोपे होणार आहे. पावसात उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी उतरवल्या जाणार नाही असे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ही भरती प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.