• फायदे व बोर्डो पेस्ट तयार करण्याबाबत दिली शेतकऱ्यांना माहिती
कुडाळ : उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आलेल्या कृषीकन्यांकडून आंब्याच्या झाडावरील बांडगूळ काढणे व तत्पश्चात बोर्डो पेस्ट तयार करून लावणे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना आंब्याच्या झाडावरील बांडगूळांमुळे होणारे नुकसान व ते कसे काढावे हे सांगण्यात आले व त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने विकसित केलेला ‘अमर बांडगूळ हत्यार’ याबद्दल माहिती दिली व हे हत्यार कसे वापरावे याचे कृषीकन्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद नोंदवला. तसेच माजी सरपंच श्री. संजय पालव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित शेतकऱ्यांनी कृषीकन्यांचे आभार मानले. अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम येणाऱ्या दिवसांमध्ये मुळदे, ता. कुडाळ मध्ये ह्या कृषीकन्यांकडून पार पडतील.
सदर गटामध्ये मनिषा सावंत, रुचिता देऊलकर, उर्मी वालावलकर, रसिका साबळे, ग्रीष्मा कुबल आणि नेहा धरणे या विद्यार्थिनींचा समावेश आहे.











