▪️सिंधुदुर्गातील शेतकरी कंपनीचा समृद्धीचा मंत्र.
▪️103 देशी बियाणे संकलन ते समृद्ध ब्रॅण्डिंग
मसुरे | झुंजार पेडणेकर :बदलत्या हवामानात आणि संकरित बियाणांच्या गर्दीत आपले अस्सल देशी वाण हरवत चालले आहेत. अशा वेळी सिंधुदुर्गातील ‘ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ने 103 दुर्मिळ आणि देशी बियाणांची ‘बँक’ उभी करून एक प्रकारे जैवविविधतेचे संवर्धन केले आहे. बियाणे संकलनापासून ते तांदूळ विक्रीपर्यंतच्या या प्रवासाने कोकणातील शेतीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे.
103 देशी आणि दुर्मिळ बियाणांचा संग्रह, त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने जोपासना आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी विक्री व्यवस्था… ‘ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ने कोकणातील शेतीला समृद्धीचा मंत्र दिला आहे. चला तर मग, जाणून घेऊया या अनोख्या ‘बीज बँके’बद्दल आणि त्यांच्या प्रवासाबद्दल….!
▪️70 देशी व दुर्मिळ बियाण्यासह प्रारंभ –
कुडाळ तालुक्यातील
पणदूर येथील ‘ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने’ 2020 मध्ये मुख्य भात व अन्य पीकवाणांचा मिळून सुमारे 70 देशी व दुर्मिळ बियाणांचा संग्रह बीज बँकेच्या रूपाने करत प्रारंभ केला होता.त्यानंतर 2022 पासून डिगस येथे मोठ्या जागेत ही बीज बँक कार्यरत आहे. बियाणे संकलन, संवर्धन, बीजोत्पादनासह बियाणे विक्री व तांदळाची विक्री, व्हॅक्युम पॅकिंग, स्टोरेज युनिट, प्रोसेसिंग युनिट, आणि सोलर सिस्टीम वर चालणारे युनिट पुढील महिन्यात कंपनी सुरु करत आहे.
▪️650 शेतकरी सदस्य नोंदणीकृत आहेत –
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य अन्नपीक आहे. सध्या जिल्ह्यात 55 हजार हेक्टरवर हे पीक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन व त्याची क्षमता असली तरी भात हे पीक केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारी शेतकरी कंपनी जिल्ह्यात अस्तित्वात नव्हती. हीच गरज ओळखून ल्युपिन फाउंडेशनचे योगेश प्रभु व अन्य लोकांनी पणदूर, रानबांबुळी परिसरातील शेतकऱ्यांना कंपनी स्थापना करण्याविषयी सुचविले. त्यातून रानबांबुळी येथील प्रगतशील शेतकरी संतोष गावडे, बाएफ संस्थेसोबत कामाचा अनुभव असलेले याच गावचे सचिन चोरगे यांनी पुढाकार घेतला. परिसरातील शेतकऱ्यांनाही कंपनीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
ल्युपिन, बाएफ यांच्यासह वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग, कृषी विभाग हे सर्व घटक शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी पुढे आले. सध्या संस्थेशी 650 सदस्य रजिस्टर आहेत.
▪️देशी बियाणांचे संवर्धन करण्याचे ध्येय-
जिल्ह्यातील पोषणमूल्य असलेल्या तसेच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पारंपरिक, अर्थात देशी बियाणांचे संवर्धन करण्याचे ध्येय कंपनीने निश्चित केले. भातासह कडधान्ये, कंद, कळ्या पिके, फळे-भाजीपाला यांच्या देशी बियाणांचे जतन करण्याचा संकल्प सोडण्यात आला. २०१९ मध्ये ‘ॲग्रीकार्ट शेतकरी उत्पादक कंपनी’ची अधिकृत स्थापना झाली. सध्या 1500 शेतकरी संलग्न आहेत.
रानबांबुळी, डिगस, हिर्लोक, अणाव, झाराप, हुमरमळा आदी गावांतील मंडळींचा समावेश आहे. संतोष गावडे (रानबांबुळी) अध्यक्ष आहेत. तर संचालकांमध्ये सचिन चोरगे, आत्माराम धावले,दर्शना पालव, विनोद सावंत, प्रणयक पालव, सुनिल कदम, उमा पालव, शरद धुरी, कैलास धावले, सूर्यकांत कुंभार, आदिसह बाजीराव झेंडे (सल्लागार ) यांचा समावेश आहे.
कंपनीचे अन्य उपक्रमसुधा असून
दुग्ध व्यवसाय व पूरक,कृषी सेवा केंद्र.
सामाईक सेवा केंद्र, सरकारी योजनेतून अवजार बँक निर्मिती.भातरोपवाटिका निर्मिती ते कापणीपर्यंतची अवजारे पुरवली जातात.
▪️पारंपरिक बियाणांचा शोध घेणे आव्हानात्मक-
संकरित आणि सुधारित भातबियाणांचा वापर अलीकडील काळात वाढला आहे. त्यामुळे अधिकाधिक पारंपरिक बियाणांचा शोध घेणे आव्हानात्मक होते. परंतु शेतकरी कंपनीच्या सभासदांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन विविध गावांतील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेणे, त्यांच्याकडून बियाणांचे संकलन करणे अशी प्रकारची मोहीमच सुरू केली. याच कालावधीत पारंपरिक बियाणांचा अभ्यास करीत असलेले तत्कालीन समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रमोद जाधव हे देखील कंपनीशी जोडले गेले. कामाच्या निमित्ताने शेकडो शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क यायचा. त्यांनी 60 टक्क्याहून अधिक भातवाणांचे संकलन करून कंपनीला दिले. काही कडधान्ये दिली.
▪️वालयला जास्त मागणी –
बियाणे बँक, तांदूळ विक्री संकलित बियाणांची लागवड, चिकित्सा, त्यातून शुद्ध बीज निवडणे, ते गरजू किंवा इच्छुक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यास कंपनीने सुरुवात केली. तीन-चार गावांत ३६ एकरांवर काही प्रयोग घेण्यात आले. बियाणे बँकेची निर्मिती करण्यात आली. कामाने जोर धरला असताना मार्च २०२० मध्ये कोरोना धडकला. सुरुवातीचे काही दिवस काम ठप्प झाले. परंतु याच संधीचा फायदा घेत आरोग्यदायी म्हणून महत्त्व असलेल्या वाणांची विक्री करण्याचे कंपनीने ठरविले. ‘वालय’ या लाल तांदळाची पेज तापासाठी उपयुक्त ठरते हे समजल्यानंतर त्यास मागणी वाढली. कंपनीने अनेक शेतकऱ्यांकडून हा तांदूळ खरेदी करून त्याची विक्री केली.
सिंधुदुर्गसह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली तसेच राज्याच्या विविध भागांतून या बियाणांना मागणी आहे. याशिवाय कंपनीकडील देशी विशेषतः लाल तांदळाची पुणे, गुजरात येथील काही व्यापाऱ्यांकडून खरेदी होते. साळीवर प्रक्रिया करून तांदूळ निर्मिती करण्यासाठी कंपनीला बजाज राईस मिलचे सहकार्य केले आहे. कोकणातील कडधान्यांची विक्रीही केली जात आहे.
▪️लाल तांदळाचे 30 प्रकार उपलब्ध –
लाल तांदळाचे सुमारे ३० प्रकार उपलब्ध आहेत त्यामध्ये वालय, बेळा, सोरटी, लाल पाटणी, खोचरी, सोनफळ, दोडद, विक्रम, तुर्या, खारा मुणगा, बारीक पाटणी, फोंडा, महाडी, सरवट, घाटी पंकज, मोगरा, डामगा, शिर्डी, काळा वरंगळ, कांगो, सणाणा, हडसू, जाड मुणगा, छोटा बेळा, सफेद बेळा, लावेसाळ, लाल कुडा, खामडी, खारल.सफेद घाटी पंकज, गुंजवळा कोथिंबिरी, राजवेल, नवाण आणि अन्य भातवाण: पांढरा वालय , यलकर, पांढरे भात, यलकट पाटणी.
भाताच्या सुमारे 52, तर अन्य पिकांच्या 51 वाणांचे संकलन करण्यात आले आहे. चवळी 10 प्रकार, वाल 6 प्रकार, मूग 3 प्रकार, कुळीथ 2 प्रकार, मटकी 4 प्रकार, नाचणी 2 प्रकार, भरडधान्य 4 प्रकार, तवसे 4 प्रकार, तीळ 3 प्रकार भोपळा 3 प्रकार, मिरची 2 प्रकार, भेंडी 2 प्रकार आदी बियाणी उपलब्ध आहेत.
▪️बाय बॅक योजना शेतकऱ्यांना लाभदायक –
कणकवली तालुक्यातील पाच गावे आणि कुडाळ तालुक्यातील पाच गावे अशी दहा गावे या सीड बँकेला जोडली गेलेली आहेत. या सीड बँक कडून बाय बॅक योजना लाल भातासाठी उपलब्ध असून बाजारभावापेक्षा प्रतिक्विंटल शंभर रुपये जादा दराने या ठिकाणी लाल भात खरेदी केले जाते. या संस्थेशी संलग्न 1500 शेतकरी असून दोन वर्षात त्यांना जास्त उत्पादन देणारे भात मोफत देण्यात येत आहे. या भातापासून सहा ते दहा टन हेक्टरी उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.
▪️कृषी विभागाचे सहकार्य आणि मार्गदर्शन –
शेतकऱ्यांची पारंपारिक वाणे जपणे, मार्केट लिंकेज, उदरनिर्वाह साहित्य मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न संस्थेकडून चालू आहे. प्रोसेसिंग युनिट स्थापन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी माफक खर्चात सुविधा देण्यात येत आहेत. शासनाच्या कृषी विभागाकडून मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत असल्याचे सचिन चोरगे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आत्मा विभाग आणि शासकीय विविध योजनांचा लाभ या युनिटला लाभला आहे.
▪️शेतकरी सक्षमिकरणाचा नवा मार्ग –
आधुनिक शेतीच्या काळात नामशेष होत चाललेल्या पारंपरिक बियाणांचे संवर्धन करण्यासाठी ‘ॲग्रीकार्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्य भातासह अन्य पीकवाणांचा मिळून सुमारे 103 देशी व दुर्मिळ बियाणांचा संग्रह कंपनीने आपल्या ‘बीज बँके’त जपला आहे. केवळ संवर्धनच नव्हे, तर बीजोत्पादन आणि विक्रीच्या माध्यमातून ही कंपनी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा नवा मार्ग उभारत आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही आहे.












