गोळवशी शाळा नंबर २ भरतेय चक्क ग्रामस्थांच्या घरात 

 

 

लांजा पंचायत समिती शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार 

संतोष कोत्रे l     लांजा -: तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही ठेकेदारांकडून शाळेचे छप्पर दुरुस्ती केली जात नसल्याने गोळवशी शाळा नं. २ ही ग्रामस्थांच्या घरात भरत आहे .पंचायत समिती शिक्षण विभागाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळेच ही वेळ आली असून यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .

तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेला गोळवशी गावातील जि.प.शाळा नंबर २ नादूरुस्त झाली आहे. संपूर्ण इमारत नव्याने बांधणे गरजेचे आहे. मात्र निधी उपलब्ध नसल्याने किमान या शाळेचे छप्पर तरी बांधून द्यावे अशी मागणी येथील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेश खानविलकर यांनी केली होती. त्यानंतर या शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी सुमारे ६० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता.तर छप्पर दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी मार्च महिन्यात

श्रमदान करून छप्परावरील कौले, वासे व अन्य साहित्य बाजूला काढून ठेवले होते. तर काम लवकर लवकर पूर्ण होईल तसे आश्वासन देखील ठेकेदाराने ग्रामस्थांना दिले होते.

‌. मात्र या गोष्टीला तीन महिन्याचा कालावधी झाला आणि शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरीही ठेकेदारांकडून शाळेचे छप्पर दुरुस्तीचे

काम हाती घेतलेले. पंचायत समिती कडूनही ठेकेदाराला जणू अभय दिले जात असल्याने तो देखील निर्धास्त आहे. तर शाळा इमारतीवर छप्पर नसल्याने नाईलाजाने ही शाळा एका ग्रामस्थांच्या

घरात भरविण्याची वेळ येवून ठेपली आहे.

याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी त्याप्रमाणे शिक्षण विभाग आणि पंचायत समिती बांधकाम विभाग यांना देखील भेट घेऊन निवेद दिले होते .मात्र तरी देखील शाळा नंबर दोन च्या छप्पर दुरुस्ती कामाला सुरुवात झालेली नाही .

एकीकडे शिक्षण विभाग शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र गोळवशी सारख्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करण्याचा विडा शिक्षण विभागाने घेतला आहे की काय ?असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थ ,पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.