रत्नागिरी | प्रतिनिधी : बेदरकारपणे दुचाकी चालवून पादचारी अल्पवयीन मुलाला पाठीमागून धडक देत अपघात केला. याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना 18 एप्रिल रोजी दुपारी 2.30 शांतीनगर येथे घडली आहे. याप्रकरणी दुचाकी चालक संकेत दत्तात्रय लिंगायत (29, रा.कसबा हरचेरी, रत्नागिरी ) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात अल्पवयीन मुलगा सार्थक सचिन माजगावकर (13,रा.नाचणे शांतीनगर बसस्टॉप जवळ, रत्नागिरी ) याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,18 एप्रिल रोजी दुपारी 2.30 सार्थक बसने शांतीनगर बसस्टॉप येथे उतरून घरी चालत जात होता. त्याच सुमारास संकेत लिंगायत आपल्या ताब्यातील ऍक्सेस दुचाकी (एमएच-08-एयू-7653) घेऊन रत्नागिरी दिशेकडून येत होता. त्यावेळी त्याने सार्थकला पाठीमागून धडक देत अपघात केला. यात सार्थकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचे ही नुकसान झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत









