घेरारसाळगड चिराचाआंबा जानकरवाडी येथे पाण्याची भिषण टंचाई

ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती
खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील  घेरारसाळगड चिराचाआंबा जानकरवाडी येथे सध्या पाण्याची  भिषण टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे  या टंचाईला ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जबाबदार असल्याचा आरोप महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच चे जिल्हाध्यक्ष
रामचंद्र बाबू आखाडे यांनी केला आहे
        चिराचाआंबा जानकरवाडी येथे मागील २५ वर्षांपूर्वी या ठिकाणी शासकीय निधीतून विहीर बांधण्यात आली होती.परंतू सन २०२२ मध्ये अतिवृष्टीत  विहीर कोसळली होती.त्यावेळी ग्रामपंचायत घेरारसाळगड व महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी यांच्याकडून सातत्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करून सन २०२२ च्या उन्हाळ्यात सदर विहीरीतून गाळ काढून ग्रामस्थांना तात्पुरती पाण्याची सोय करण्यात आली होती.त्यावेळी सदर विहीर अतिवृष्टीच्या आराखड्यात घेण्यात आली होती परंतु शेवटपर्यंत काही निधी मंजूर झाला नाही.ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता खेड यांच्या सांगण्यावरून ठेकेदार संतोष कदम यांनी सलग ८ दिवस मजूर लावून विहीरीतून गाळ काढला होता.पुढे विहीरीच्या बांधकामाला निधी मंजूर न झाल्याने पुन्हा सन २०२३ च्या पावसाळ्यात सदर विहीर पुन्हा गाळाने भरून गेली होती.
       सन २०२३ साली जलजीवन योजनेंतर्गत सदर विहीरीला निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व संबंधित ठेकेदार यांना वारंवार विनंती करूनही सदर विहीरीचे काम वेळेवर प्राधान्याने केले नाही.पाऊस सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर ठेकेदाराने विहीरीचे खोदकाम सुरू केले परंतु बांधकाम न झाल्यामुळे पुन्हा सन २०२४ च्या पावसाळ्यात पुन्हा विहीर गाळाने भरून गेली आहे.
       सध्या विहीरीत किंचितही पाणी नाही.जवळपास कोठेही पाण्याचा स्रोत नाही.त्यामुळे सध्या चिराचाआंबा जानकरवाडी येथील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत.हा त्रास सलग दोन उन्हाळे ग्रामस्थ सहन करत आहेत.
       सध्या जलजीवन योजनेंतर्गत विहीरीच्या बांधकामासाठी निधी मंजूर आहे.परंतू पावसाळा संपून दोन महिने होऊनही संबंधित ठेकेदार काम सुरू करत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.चिराचाआंबा जानकरवाडी येथे सर्व मागासवर्गीय धनगर समाजाचे बांधव राहात असुन प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी नेहमीच धनगर समाजाच्या विकासाकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत असल्याचे आखाडे यांनी सांगितले