को रे मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक अखेर पूर्वपदावर

 

खेड (प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांची संख्या वाढल्याने गेल्या आठवडाभरापासून बिघडलेले वेळापत्रक बुधवारी काही अंशी पूर्वपदावर आले. गणपती स्पेशल गाड्या निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला.

६ नियमित गाड्यांचा अपवाद वगळता सर्वच रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत रवाना झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. गणेशोत्सवास प्रारंभ झाल्यापासून कोकण मार्गावरून धावणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांसह नियमित गाड्या लेट धावत होत्या ‘

बुधवारी गणपती स्पेशल गाड्या नियोजित वेळेत धावल्याने प्रवाशांना हायसे वाटले. ६ नियमित गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. सीएसएमटी-मंगळूर एक्स्प्रेसह निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस ३ तास विलंबाने धावल्या. सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस ३ तास, तर तिरुवअनंतपूरम- निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस २ तास उशिराने रवाना झाल्या. अन्य ३ गाड्यांचा अपवाद वगळता उर्वरित रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत रवाना झाल्याने चाकरमान्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.