जावडे शिंदेवाडी येथील घटना, मोठ्या भावावर गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी) रेशन कार्ड वरील धान्य कोणी व केव्हा घ्यायचे या किरकोळ कारणावरून मोठ्या भावाने सख्या लहान भावाला बांबूने पायावर आणि डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याची घटना बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास जावडे शिंदेवाडी येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची तक्रार प्रमोद शरद शिंदे (वय ३५ राहणार जावडे शिंदेवाडी) याने लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास प्रसाद शरद शिंदे (वय ३६, सध्या राहणार महालक्ष्मी चौक, खेडशी रत्नागिरी, मुळगाव जावडे शिंदेवाडी) याने आपल्या जावडे शिंदेवाडी येथे घरी जाऊन लहान भाऊ प्रमोद शिंदे याला रेशन कार्डवरील धान्य कोणी व केव्हा घ्यायचे या कारणावरून जांब विचारला. तसेच प्रमोद याला शिवीगाळ व दमदाटी केली. त्याचप्रमाणे बांबुने त्यांच्याडोक्यावर मारून त्याला जखमी केले. तसेच त्याला ठार मारण्याची धमकी दिली .
याप्रकरणी लहान भाऊ प्रमोद शिंदे याने केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी प्रसाद शिंदे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैदाड या करीत आहेत.










