शिवीगाळ, ठार मारण्याची धमकी देत महिलेला कोयतीने दुखापत

  • दीर आणि सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

लांजा( प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ, ठार मारण्याची धमकी देत कोयतीने महिलेच्या हाताला दुखापत केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी महिलेचा दीर आणि सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद आयशा दिलदार थोडगे (वय ३० राहणार कोर्ले मुस्लिम वाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. आयशा थोडगे व त्यांचे नात्याने दीर असलेले मुबारक इब्राहिम थोडगे (वय ४५) आणि सासरे इब्राहिम युनुस थोडगे (वय ७०) हे एकाच घरात विभक्त राहतात.त्यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वादविवाद आहेत.दिनांक ६ जून रोजी आयशा थोडगे यांचे पती दिलदार इब्राहिम थोडगे हे चिपळूणवरून आपल्या घरी आले होते आणि त्यानंतर त्यांनी आपली कार घरासमोर पार्क केली होती.

त्यावेळी मुबारक थोडगे आणि इब्राहिम थोडगे या पिता पुत्रांनी दिलदार थोडगे यांना तू इथे गाडी लावायची नाहीस. तुझे इथे काहीही नाही असे सांगितले. मात्र दिलदार थोडगे यांनी गाडी इथेच लावणार असे सांगितले. याचा राग घेऊन मुबारक व इब्राहिम यांनी त्यांच्या गाडीचा कारचा काचेवर हात मारून शिवीगाळ करू लागले. याच दरम्यान आयशा या घराच्या बाहेर आल्या .त्यावेळी त्या दोघांनी त्यांना देखील शिवीगाळ केली तर मुबारक थोडगे याने आयशा यांना नारळाच्या झापाने मारून, शिवीगाळ केली. तसेच तू इकडे ये तुला खल्लास करतो. तू सर्व भांडणाची जड आहेस. तुला कोयतीने कापून टाकतो अशी धमकी दिली. तसेच घरातून कोयती घेऊन तो आयशा यांच्या अंगावर जाऊन गेला.त्यावेळी आयशा यांनी बचावासाठी हात मध्ये घातला असता कोयतीने त्यांचे एका हाताचे मधल्या बोटाला व उजव्या हाताचे करंगळी बाजूचे बोटाला लागून दुखापत झाली .

याप्रकरणी आयशा थोडगे यांनी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी आयशा यांचा दीर मुबारक थोडगे आणि सासरा इब्राहिम थोडगे या दोघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(२) ,१३१, ३ (५) याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार भालचंद्र रेवणे हे करत आहेत.