पर्यटनासाठी आलेल्या छत्तीसगड पोलीसाचा आंबोली दरीत कोसळून मृत्यू

सावंतवाडी । प्रतिनिधी : गोव्यातून पर्यटन करून कर्नाटकात परतत असताना वाटेत आंबोली घाटात थांबलेल्या छत्तीसगड पोलीस जवानाचा पाय घसरून दरीत पडल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. आंबोली पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या सहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडवरून छत्तीसगड रिझर्व पोलीस हे कर्नाटक रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आले होते. काही काळ सुट्टीचा मिळाल्यामुळे ते एकूण पाच जण सर्व छत्तीसगड पोलिसात कार्यरत असलेले पोलीस गोव्याला पर्यटनासाठी म्हणून शनिवारी सकाळी गेले होते. शनिवारी रात्री आठच्या सुमारास गोव्याहून पर्यटन करून परतत असताना ते आंबोली घाटातील धबधबे जवळील एका वळणावरती थांबले. त्यातील तिघेजण खाली उतरले. त्यातील मीतेलेस पॅकेरा (३५) हा दरीच्या दिशेने गेला. परंतु तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो जवळपास ३०० फूट खोल खाली कोसळला.

रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं हे त्याच्यासोबत असलेल्यांना देखील कळलं नाही. त्यांनी लागलीच आंबोली पोलीस स्थानकातील दत्तात्रय देसाई यांना संपर्क केला व दत्ता देसाई यांनी आंबोली रेस्क्यू टीम व स्वतः घटनास्थळी जात मीतेलेश याला केवळ अर्ध्या तासात खाली दरीत उतरत वाचवण्याचा प्रयत्न केला.

ज्यावेळी रेस्क्यू टीमचे अजित नार्वेकर मायकल डिसोजा हे खाली पोहोचले त्यावेळी त्याचा श्वास सुरु होता. परंतु काही काळाने तो मृत्युमुखी पडला. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीम मार्फत त्याचा मृतदेह वर काढण्यात आला.

याबाबतची खबर त्याच्या वरिष्ठांना देण्यात आली असून त्याचे वरिष्ठ कर्नाटक येथून येण्यास रवाना झाले आहेत. आंबोली रेस्क्यू टीम मार्फत व अंबोली पोलीस स्थानक पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई दीपक शिंदे अभिजीत कांबळे दीपक नाईक आदी यांनी घटनास्थळी जात तत्परतेने बचाव कार्यास मदत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवण्यात आला. रविवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Sindhudurg