सर्वत्र धुळीचे साम्राज्य; प्रवाशांना होतोय त्रास, सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
खेड(प्रतिनिधी) खेड रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरण कामासह रस्ता रुंदीकरणाच्या लोकार्पणानंतर अपूर्णावस्थेत असलेली अंतर्गत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित ठेकेदाराकडून हालचाली सुरू आहेत. मात्र सुशोभिकरणाच्या लोकार्पणानंतर रेल्वेस्थानकाबाहेरील परिसराची अद्याप स्वच्छता करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
येथील सार्वजनिक बांधकाम खात्याकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरणासह रस्ता कॉक्रिटीकरणासाठी ९ कोटी ९० लाख रुपयांचा निधी खर्चून नवा साज देण्यात आला आहे. तब्बल २९ वर्षानंतर रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात नवी भर पडली आहे.
एकीकडे सुशोभिकरणानंतर रेल्वेस्थानकाला नवा साज चढलेला असतानाच दुसरीकडे सुशोभिकरण
कामाच्या लोकार्पणानंतर।स्थानकाबाहेरील परिसराची स्वच्छता करण्यात आली नसल्याची बाब अधोरेखित झाली आहे. स्थानकाबाहेरील परिसरात सगळीकडेच धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसराची स्वच्छता करायची कुणी यावरून एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे स्वच्छतेबाबत सातत्याने सूचना केल्या जात असतानाही दाद दिली जात नसल्याचे समजते. याचा नाहक त्रास प्रवाशांना बसत आहे. सर्वत्र पसरलेल्या धुळीच्या साम्राज्यामुळे सुशोभिकरणानंतरही परिसर बकाल बनत चालला आहे.










