खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील तिसंगी – नवानगर येथील एका गृहिणीची ४७ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची फिर्याद ४ जानेवारी रोजी येथील पोलीस स्थानकात झाली दाखल झाली आहे.
साक्षी शैलेश भोसले (३४) असे या ऑनलाईन फसवणूक झालेल्या गृहिणीचे नाव असून त्यांनी येथील पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भा वि.सं.क. ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .
सौ. साक्षी भोसले राहत्या घरी असताना
एका अनोळखी इसमाने त्यांच्या मोबाईल नंबरवर फोन करून, आपण एल. आय. सी. ऑफिसमधून बोलतोय, तुमचे पती शैलेश भोसले यांचा एल. आय. सी. पॉलिसीचा हप्ता जमा होत नसल्याने तो हप्ता तुमच्या खात्यावर जमा करावयाचा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलमधील गुगल पे अॅप्लीकेशन ओपन करा व मी सांगतो त्याप्रमाणे तुमच्या गुगल पे खात्यावर कारवाई करा म्हणजे तुमच्या पतीचा एल. आय. सी. चा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होईल असे सांगून या गृहिणीचा विश्वास संपादन केल्यानंतर या गृहिणीने त्यांच्या मोबाईल फोनमधील गुगल पे अप्लीकेशनमध्ये सेटिंग केली असता अज्ञाताने गृहिणीची एकूण ४७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली











