पुढील 25 वर्षे आमदार म्हणून निलेश राणे यशस्वीच ठरतील!

राणे कुटुंबाच ‘किंगमेकर’ ठरले ; मजबूत संघटन व जनतेचा भक्कम पाठिंबा यामुळे विजय निश्चित झाला

विरोधकांना काहींनी रसद देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अपेक्षित मताधिक्य घटले

भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मांडली रोखठोक भुमिका

मालवण | प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर खरे किंगमेकर राणे कुटुंबीय आहे हे निश्चित झाले. सोबतच किंगमेकर म्हणून ना. रवींद्र चव्हाण यांचीही भुमिका महत्वपूर्ण ठरली. मालवण कुडाळ मतदारसंघातून आमदार निलेश राणे पुढील 25 वर्षे आमदार म्हणून यशस्वी ठरतील. आम्हाला आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत मोठे यश प्राप्त होईल. असा विश्वास भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, संघटन कौशल्य यामुळेच महायुतीला सर्व ठिकाणी यश मिळाले. या मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य घटले त्याची खंत आहे. त्याबाबत तालुकाध्यक्ष म्हणून मी नेतेमंडळी यांची माफी मागतो. मात्र कुडाळ – मालवण विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांची ताकद कोणतरी वाढवत होते. संबंधितांकडून निलेश राणेंचा पॉलिटिकल एन्काऊंटर करण्याचा प्रयत्नही काहींनी केला. मात्र मजबूत संघटन, हिंदुत्ववादी संघटना यांची साथ व जनतेचा भक्कम पाठिंबा यामुळे आमदार निलेश राणे यांचा विजय निश्चित झाला.

मालवण भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत भुमिका मांडली. मालवण भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी भाजपा कुडाळ मालवण संयोजक तथा जिल्हा बँक संचालक बाबा परब, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, जिप माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, विजय निकम, मंगेश चव्हाण, सतीश वाईरकर, विरेश पवार, जगदीश चव्हाण, शेखर फोंडेकर, राजन माणगावकर, मिलिंद झाड यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. चिंदरकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भाजपचे सर्व कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभारी असतील. सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, सरपंच भाजपचे सर्व प्रमुख कार्यकर्ते यांचेही तसेच शिवसेना (शिंदे गट) तळागळातील कार्यकर्ते यांचे आभार मानत आहे.

आमदार निलेश राणे लवकरच आमदार पदाची शपथ घेतील. त्यानंतर ते मतदार संघात भेटी देतील जनतेचे आभारही मानतील. कुडाळ मालवण मधील जनतेने महायुतीचे उमेदवार म्हणून निलेश राणे यांच्यावर जो विश्वास टाकला तो विश्वास त्याच्या काळात निश्चितच सार्थकी लावतील. या निवडणुकीचा लेखाजोगा घेत असताना काही गोष्टी निदर्शनास आल्या. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत विधानसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे मताधिक्य २८ हजाराचे होते मात्र हे मताधिक्य वाढविण्यात कमी पडलो. याबद्दल खा. नारायण राणे, ना. रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माफी मागतो. विधानसभा निवडणुकीत मालवण तालुक्यातील सुमारे पंधरा हजाराचे मताधिक्य मिळेल असा शब्द मी रवींद्र चव्हाण यांना दिला होता. दहा हजारापेक्षा कमी मताधिक्य मिळणार नाही असा मला विश्वास होता. मात्र माझी लाडकी बहीण योजना असो किंवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठीक ठिकाणी झालेले प्रवेश असो या मताधिक्यात वाढ होणे अपेक्षितच होते. आमदार निलेश राणे स्वतः तळागाळात राहून निवडणुकीत काम करत होते. खा. नारायण राणे यांनी अनेक भेटीगाठी घेतल्या. अशा परिस्थितीत मताधिक्यात वाढ होणे गरजेचे होते. मात्र ते मताधिक्य आम्ही देऊ शकलो नाही हे आमच्यासमोर एक चिंतेचे कारण आहे.

या निवडणुकीच्या काळात अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी प्रामाणिकपणे काम केले. मात्र निवडणूक निकालानंतर गेल्या दहा दिवसात वेगवेगळ्या विभागात फिरल्यानंतर काही पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले की निलेश राणे यांची ताकद एकत्र असली तर कोणाला तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे ती वाटली गेली पाहिजे. त्यामध्ये छेद व्हायला पाहिजे याचा कोणीतरी पद्धतशीरपणे वापर केला. आमदार निलेश राणे यांच्या पाठीशी एकसंघ ताकद राहता कामा नये. असा कोणाचातरी प्रयत्न होता.

वैभव नाईक यांना जी काही मते मिळाली ती वैभव नाईक यांची नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांची ही नाहीत. कारण ते ३० टक्के तर ७० टक्के आम्ही दिसत होतो. याचा अर्थ कोणीतरी वैभव नाईक यांना मसल पावर अंतर्गत पुरवित होते. यामुळेच मताधिक्य घटले आहे. कोणीतरी वैभव नाईक यांची ताकद आतून वाढवित होतं कि काय असा प्रश्न आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकाराची शहानिशा होणे गरजेचे आहे.

आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये ज्या बूथमधून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळत होते. त्या बुधवर मताधिक्य घटले. आमदार निलेश राणे यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर करायचा होता का? हा प्रश्न आहे. कारण लोकसभेतील मिळालेले मताधिक्य पाहता विधानसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य कसे घटू शकते असा प्रश्न आहे.

आज हे बोलल्यामुळे कदाचित आपल्यावर कारवाई होईल. मात्र गेल्या ३० वर्षाच्या राजकारणात जे काय आहे ते मी बोलतो. परंतु बूथ वाईज आकडेवारी पाहिल्यानंतर आपण थक्क झालो आहोत. माझ्या मतदारसंघातील आढावा घेतल्यानंतर विरोधका मधूनच सांगण्यात आले तुमचेच काही माणसे आमचे स्पॉन्सर होते असे सांगितले गेले. परंतु असे जर काही घडले असेल ते अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र आमदार निलेश राणे, ना. रवींद्र चव्हाण यांनी जो विश्वास ठेवला तो आम्ही सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर खरे किंगमेकर कोण तर ते राणे कुटुंबीय आहे. जिल्ह्याचे किंग मेकर हे रवींद्र चव्हाण आहेत हे दोनच किंगमेकर आहेत. तसेच जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जे संघटन कौशल्य वापरले त्यामुळेच महायुतीला यश मिळाले आहे. या मतदारसंघात जे मताधिक्य घटले त्याची खंत आहे मात्र आगामी काळात जिल्हा परिषद निवडणुका होत असून त्यासाठी भाजपने आतापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूका मोठ्या ताकदीने लढविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचेही श्री. चिंदरकर यांनी स्पष्ट केले.