मुंबई (प्रतिनिधी) : देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर गुरुवारी, ५ डिसेंबरला सायंकाळी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केंद्रातून आलेले निरीक्षक गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडवणीसांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपा आमदारांनी, नेत्यांनी विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एकच जल्लोष केला आहे.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मागील दोन वेळच्या मुख्यमंत्रिपदाचा धावता आढावा घेत विरोधकांनाही चिमटे काढले आहेत. तसेच यंदाच्या ऐतिहासिक विजयाने आपली जबाबदारी वाढली असून, आपली प्राथमिकता जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण करण्यावर असायला हवी, असे ते म्हणाले आहेत.
महायुतीने केला सत्ता स्थापनेचा दावा
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण २३७ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले. राजभवनात दाखल होण्यापूर्वी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. त्यानंतर, हे तिन्ही नेते सत्ता स्थापनेसाठी एकाच गाडीतून राजभवनाकडे रवाना झाले. त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करणारे पत्र राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना सादर केले. यावेळी प्रफुल्ल पटेल, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, उदय सामंत, धनंजय मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, विनय कोरे, प्रसाद लाड उपस्थित होते. तसेच, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन, भाजप नेते विजय रूपाणी उपस्थित होते.
राज्यपालांनी दिले सत्तास्थापनेचे आमंत्रण
राज्यपालांच्या भेटीनंतर महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सत्ता स्थापनेविषयी माहिती दिली. आम्ही आज राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले. महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. आम्हाला उद्या सायंकाळी साडेपाचची शपथविधीसाठी वेळ दिली आहे. शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या नावाची शिफारस केली. तसे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले आहे. त्याबद्दल शिंदे यांचे विशेष आभार. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनीही त्याच आशयाचे पत्र राज्यपालांना दिले आहे. त्यासाठी राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आमच्यासाठी तांत्रिक बाब आहे. आम्ही सगळे निर्णय एकत्रित घेतले आहे. इथून पुढेही असेच निर्णय घेऊ. आम्हाला महाराष्ट्राला चांगले सरकार देण्याचा प्रयत्न करु, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
नाराजीच्या केवळ चर्चा, फडणवीसांना पाठिंबा
खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. इतके बहुमत युती सरकारला याआधी कधी मिळाले नव्हते. माझ्या नाराजीच्या फक्त चर्चा सुरू आहेत, असे स्पष्ट करत शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे, असे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे बोलत होते. अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाची शिफारस केली होती. आज मी त्यांची मुख्यमंत्रिपदासाठी शिफारस केली आहे. शिवसेनेने फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे. मागील अडीच वर्षात एक टीम म्हणून आम्ही काम करत होतो. मला काय मिळाले. यापेक्षा राज्यातील जनतेला काय देऊ शकतो, याचा विचार करून काम केले. हे सरकार जनतेसाठी काम करणार आहे. महाविकास आघाडीने प्रकल्प थांबविले होते. आम्ही मार्गी लावले. सरकार हे सर्वसामान्यांसाठी असते. अनेक कल्याणकारी योजना मार्गी लावल्या. आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या कल्याणकारी योजना राबविल्या नव्हत्या. त्या आम्ही राबविल्या याचा आनंद आहे, असे शिंदे म्हणाले.
पर मैं तो रुकनेवाला नाही
मुख्यमंत्र्यांसह तुम्हीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटले की, देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केले आहे. संध्याकाळपर्यंत थांबा तुम्हाला सगळे कळेल. त्यावर अजित पवारांनी म्हटले की, संध्याकाळपर्यंत त्यांचा समन्वय येईल, पर मैं तो रुकनेवाला नाही, पण मी तर शपथ घेणारच आहे..अजित पवारांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी म्हटले की, दादांना अनुभव आहे. सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.












