एलसीबीने अट्टल चोरट्याला तळेरेतून ठोकल्या बेड्या
कणकवली:
कणकवली शहरातून चोरीस गेलेल्या दुचाकीचा छडा लावण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुशांत सिद्धार्थ यादव (वय १९, मूळ रा. श्रावण बौद्धवाडी, ता. मालवण सध्या रा. तळेरे) याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.
२८ फेब्रुवारी रोजी सुनील कोरगावकर यांनी आपली सुझुकी ऍक्सेस दुचाकी कणकवली शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर उभी केली होती. या दुचाकीची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा समांतर तपास एलसीबी सिंधुदुर्गचे पथक करत होते. तांत्रिक कौशल्य आणि मानवी माहितीच्या आधारे ही दुचाकी तळेरे येथील एकाने चोरल्याचे एलसीबीला समजले होते.
त्यानुसार, गुरुवारी ३० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता एलसीबीच्या पथकाने तळेरे येथे शोध घेतला असता, तिथे एका बेकरीच्या भट्टीमध्ये काम करत असलेल्या सुशांत यादव याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला तिथून ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांच्या हवाली केले. आरोपी सुशांत यादव हा अट्टल दुचाकीचोर असून यापूर्वीही त्याच्यावर दोनवेळा दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई आणि आशिष गंगावणे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.












