देवगड (प्रतिनिधी): देवगड-जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती पद आणि महिला-बालकल्याण उपसभापती पदाची निवडणूक आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप प्रणीत देवगड-जामसंडे नगर विकास समितीने जिंकली. बांधकाम समिती सभापतीपदी गटनेते शरद ठुकरूल, पाणीपुरवठा व जलनिसरण समिती सभापतीपदी सौ. प्रणाली माने, स्वच्छता, वैद्यक,जलनिस्सारण व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी सौ. आद्या गुमास्ते, तर महिला-बालकल्याण उपसभापतीपदी सौ. ऋचाली पाटकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक पीठासीन अधिकारी जगदीश कातकर यांनी याची अधिकृत घोषणा केली.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती व महिला-बालकल्याण उपसभापती पदाच्या निवडणुका नगरपंचायत सभागृहात बुधवारी संपन्न झाल्या. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी जगदीश कातकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुख्याधिकारी सुरज कांबळे, नगरपंचायत पदाधिकारी, सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
निवडीनंतर समित्यांच्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. बांधकाम समिती सभापतीपदी शरद ठुकरूल, सदस्यपदी सौ. तन्वी चांदोस्कर, निवृत्ती उर्फ बुवा तारी यांची निवड झाली. पाणीपुरवठा व जलनिसरण समिती सभापतीपदी सौ. प्रणाली माने, सदस्यपदी सौ. स्वरा कावले व संतोष तारी यांची निवड झाली. स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी सौ. आद्या गुमास्ते, सदस्यपदी विशाल मांजरेकर, मनीषा जामसंडेकर यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण उपसभापतीपदी सौ. ऋचाली पाटकर यांची निवड झाली.
यापूर्वी नगरपंचायतीवर शिवसेना गटाची सत्ता होती. मात्र, महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी भाजप गटात सामील होत सत्ता समीकरण बदलले. त्यामुळे महाविकास आघाडी ८ विरुद्ध ९ असे बहुमत भाजपच्या बाजूने झाले आणि निवडणुकीत भाजपने बाजी मारली.
अडीच वर्षांच्या राजकीय घडामोडीनंतर भाजपच्या सभापती विराजमान झाल्यानंतर भाजप नेते बाळा खडपे, जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर, संतोष किंजवडेकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुस्कर, संजना आळवे, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष योगेश पाटकर, दयानंद पाटील, संजय तारकर, गणपत गावकर, मिलिंद माने, रवींद्र चिंदरकर व सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले.