सावंतवाडी । प्रातिनिधी : चौकुळ गावच्या सरपंचपदी गुलाबराव
गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते सरपंच सुरेश उर्फ बाबू शेटवे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी गुलाबराव गावडे यांची आज एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
गुलाबराव गावडे हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय तसेच सहकार क्षेत्रात कार्यरत असुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यात ते कायम सक्रिय असतात. विविध योजना गावात आणण्यात त्याचा हातखंडा असुन राजकारण बाजुला ठेवुन त्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांचे आजोबा कै. काशिराम नारायण गावडे यांनीही यापुर्वी चौकुळचे सरपंच पद भुषवलेले होते. जि. प. चे माजी अध्यक्ष कै. चंद्रकांत गावडे यांच्या सोबत राजकारणात आलेले गुलाबराव गावडे हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य असुन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे समर्थक म्हणुन ते ओळखले जातात. या निवडीबद्दल गुलाबराव गावडे यांनी भाजपाचे तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांचे आभार मानले आहेत.











