खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील भरणे मंडळ विभागात नागरिकांच्या सोयीसाठी ३० एप्रिल रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नवभारत हायस्कूल, भरणे नाका येथे पार पडणार असून या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना एकाच छताखाली, एकाच वेळी शासकीय शुल्कामध्ये तब्बल पंधरा विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. महसूल विभागाशी संबंधित विविध कामे, दाखले, प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक शासकीय सेवा नागरिकांना सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच त्यांचा वेळ आणि खर्च वाचावा यासाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
भरणे मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख यांनी प्रहारशी बोलताना या शिबिराची माहिती देत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले.











