कर्ला येथे भरदिवसा झाली होती लाखोंची घरफोडी
रत्नागिरी ः प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी शहरातील कर्ला येथील घरातून भरदिवसा घरात घुसून तब्बल साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या संशयिताच्या मुसक्या शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पाथकाने रविवार 8 डिसेंबर रोजी आवळल्या.त्याच्याकडून 2 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अलमुईब अजगर सोलकर (29,रा.आयशा अपार्टमेंट कर्ला उर्दु शाळेच्या पाठीमागे,रत्नागिरी)
असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. चोरीची ही घटना बुधवार 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 वा. कालावधीत घडली होती.अलमुईब अजगर सोलकर विरोधात फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय बातमीदाराच्या आधारे तपास करत असताना सोलकरला अटक केली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार विलास जाधव, अरुण चाळके, अमोल भोसले, राहुल जाधव, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, पोलीस नाईक भालचंद्र मयेकर, पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे, कौस्तुभ जाधव यांनी तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या मदतीने तपास करून केली.











