रत्नागिरी । प्रतिनिधी
जयगड येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वायू गळतीमुळे झालेल्या त्रासाशी कोणताही संबंध नाही असे JSW ENERGY कडून एका पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
आज गुरुवार दिनांक 12/12/2024 रोजी दुपारी 2:30 ते 3:00 चे दरम्यान जयगड येथील माध्यमिक विद्यालयातील तब्बल ६० विद्यार्थ्यांना वायुचा वास पसरल्याने मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरु झाला. या शाळेशेजारी JSW कंपनीचे काम चालते. ये परिसरात काम सुरु असताना ही वायू गळती झाली आणि विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला असे पालकांकडून आणि नागरिकांकडून सांगण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकाराशी संबंधित एक पत्रक JSW ENERGY कडून प्रसार माध्यमांना पाठवण्यात आले. त्यात म्हटल्याप्रमाणे,
JSW ENERGY च्या रत्नागिरी येथील थर्मल प्लांटमध्ये कोणतीही गॅस साठवण सुविधा नाही. तसेच जयगड येथील वायू गळती प्रकरणाशी सुद्धा कंपनीचा कोणताही संबंध नाही असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. JSW एनर्जीमध्ये, आम्ही आमचे कर्मचारी, समाज आणि पर्यावरण यांच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला प्राधान्य देतो. आम्ही कठोर सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करतो आणि आमच्या कामकाजावरआमचे पूर्ण लक्ष असते, कंपनीकडून सर्वोच्च मानकांची पूर्तताकेली जाते. सुरक्षेसाठी आमची बांधिलकी अटूट आहे आणि आजूबाजूच्या जनतेच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर परिणाम करणारी कोणतीही घटना टाळण्यासाठी आम्ही सर्व खबरदारी घेतो असे या पत्रकात म्हटले आहे.






