सावकाराने कपडे विक्रेत्याला जीवे मारण्याची दिली धमकी
चिपळूण : पाच लाख कर्ज घेऊन त्याच्या व्याज आणि मुद्द्लापोटी ३७ लाखांची परतफेड केली.
त्यानंतर व्याजाची रक्कम दरमहिना देण्यास नकार दिल्याने एका सावकाराने कपडे विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना कालावधीत व्यवसाय बंद राहिल्याने त्याला उभारी देण्यासाठी कापड विक्रेत्याने सावकाराकडून ५ लाख रुपये घेतले. त्याच्या मोबदल्यात दोन वर्षात तब्बल ३७ लाखाची परतफेड केली. तरीही जीवे मारण्याची धमकी दिल्याने गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे वैभव भालचंद्र सावंत असे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबतची फिर्याद स्वानंद शांताराम बांबाडे (३८) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांबाडे यांचे सावर्डे बाजारपेठेत कपड्याचे दुकान आहे. कोरोना कालावधीत दुकान बंद राहिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. ओळखीचा असलेला वैभव सावंत हा व्याजाने पैसे देण्याचा व्यवहार करतो, याची माहिती असल्याने बांबाडे यांनी वैभवकडून सप्टेंबर २०२१ मध्ये ५ लाख रुपये १० टक्के व्याजदराने घेतले होते. या कर्जापोटी बांबाडे यांनी सावंत यास सप्टेंबर २०२१ ते २३ नोव्हेंबर पर्यंत ३७ लाख रुपये दिले. ही रक्कम ऑनलाईन अॅपद्वारे तसेच काही रक्कम रोख स्वरूपात दिली आहे. तरी देखील वैभव हा व्याजापोटी १ लाख ४५ हजार रुपये येणे असल्याचे सांगून त्याची मागणी करत होता. दर महिना ही रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगून त्यास नकार दिला. व्याजाची रक्कम देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून वैभव याने बांबाडे यांना त्यांच्या सावर्डे बाजारपेठेतील दुकानाच्या ठिकाणी तसेच घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सावंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










