दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप
चिपळूण | वार्ताहर : सदगुण, सदाचार आणि सदविचार हे माणसाचे अलंकार आहेत.या अलंकारांना शालेय जीवनामध्ये प्रफुल्लित करण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षकांनी केलेले संस्कार हेच विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत असते. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर पैलू पाडण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे ज्ञानाची शिदोरी आणि शिक्षकांचे संस्कार हे नेहमी स्मरणात ठेवा, असे उदगार आदर्श विद्या मंदिर चिवेली हायस्कूलचे व्हा. चेअरमन पत्रकार संतोष कुळे यांनी दहावीच्या निरोप समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले.
तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास संस्था संचालित आदर्श विद्या मंदिर चिवेली मधील इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शुक्रवार दिनांक २४ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी विचारमंचावर स्कूल कमिटीचे चेअरमन यशवंत शिर्के ग्राम समितीचे उपाध्यक्ष किसन कदम शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण, शिक्षक नितीन गुरव, श्री आंब्रे, श्री चव्हाण, सौ प्रियंका ढाकणे उपस्थित होत्या. या कार्यक्रमांमध्ये प्रथम मुख्याध्यापकांच्या हस्ते सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दहावीच्या मुलांना निरोप देताना इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी खुशी जाधव नवीतील प्रथमेश जाडे आणि विद्यार्थ्यांनी सही शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दहावीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वटवृक्षाच्या विसावलेल्या शाळेतील पक्षी आज निरोप घेत आहे अशा भावनिक शब्दांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमात पुढे बोलताना श्री. कुळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शालेय जीवनच महत्त्वाचे असते. शाळेतील बालपणाचा आनंद व शैक्षणिक कालखंड यामुळेच विद्यार्थ्यांच्या पुढच्या जीवनाला कलाटणी मिळत असते. इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी करिअरच्या वाटा निवडताना आपल्या स्वतःच्या मनातील आवड जोपासावी आणि त्यानुसार विविध क्षेत्र निवडावे, असा सल्ला त्यांनी दिला. त्याचबरोबर दहावीच्या परीक्षेचा पेपर सोडताना शांत डोकं, संयम ठेवून आणि प्रकृती सांभाळत योग्य आहार घेत परीक्षा सामोरे जावे. यावेळी ग्राम समिती उपाध्यक्ष किसन कदम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की चिवेली हायस्कूलमध्ये होणाऱ्या परीक्षा आपल्या खोलीत होत असत. मात्र दहावीच्या बोर्डाची परीक्षा इतर केंद्रावर होत असल्याने थोडेसे मनावर दडपण येते. हे दडपण न घेता शांत विचाराने पेपर सोडवावा. आयुष्यात पुढे जाल तेव्हा पुन्हा शाळेकडे परतून बघावं असं त्यांनी सुचित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेट वस्तू दिल्या. त्याच बरोबर श्री आंब्रे आणि व्हा. चेअरमन संतोष कुळे यांनी सुद्धा मुलांसाठी भेट वस्तू दिल्या. त्यांचे सुद्धा वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक संजय चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांना निरोपपर शुभेच्छा देताना ते भावूक झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मनस्वी गुजर व अक्षा परकार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार नितीन गुरव यांनी मानले.